पार्कमधील तरूण जोडप्यांना त्रास देणाऱ्या पोलिसांना वकिलाने शिकवला धडा


सामना ऑनलाईन । चंदिगड

हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधील रोडरोमियोंना आवर घालण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केलं आहे. मात्र अनेकदा पोलीस रोडरोमियोंवर कारवाई न करता सार्वजनिक ठिकाणी बसलेल्या जोडप्यांना त्रास देताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पोलीस तरुण जोडप्याची चौकशी करताना दिसत आहेत. पोलीस या जोडप्याची वैयक्तिक माहिती विचारत आहेत. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने थेट या जोडप्याची चौकशी करण्याचं नेमकं कारण काय आहे? असा प्रश्न पोलिसांना विचारला.

जोडप्याची चौकशी का करतोय याचं समाधानकारक उत्तर पोलिसांना देता आला नाही. पोलिसांना प्रश्न विचारलेल्या व्यक्तीने आपण दिल्ली हायकोर्टात वकील असल्याचं सांगितलं. तसेच तुम्ही नियमानुसार या जोडप्याची अशी चौकशी करू शकत नाही, असंही ती व्यक्ती म्हणाली. त्यामुळे तिथे उपस्थित एका महिला पोलिसाने नमती भूमिका घेत, ही मुलं आमच्या मुलांसारखीच आहेत, आम्ही त्यांना त्रास नाही देत आहोत, असं स्पष्ट केलं. व्हिडिओमधील मुलाचे वय २६ वर्ष तर मुलीचे वय २१ वर्ष असल्याने संविधानानुसार, अठरा वर्ष पूर्ण केलेल्या मुलांना आपल्या मर्जीनुसार जीवन जगण्याचा अधिकार आहे, असं त्याने पोलिसांना सुनावलं.