पायाभूत सुविधांसाठी आदिवासी बांधवांचे उपोषण

सामना ऑनलाईन । येवला

सत्यगावमध्ये रस्ता क्राँक्रिटीकरण, पथदिवे आणि पिण्याच्या पाण्यासह पायाभूत सुविधांचा अभाव आहे. आदिवासी बांधवांच्या या मागण्यांकडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी पंचायत समितीसमोर सुरू केलेले उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

येथील कानिफनाथ नगरमधील रस्ता दुरुस्ती न झाल्याने उकिरडा बनला आहे. रस्त्यात घरकुलाच्या कामाचे दगड मुरूम टाकला असल्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पथदीपदेखील बंद असल्यामुळे सणासुदीच्या काळात अंधारात राहावे लागत आहे. गावातील सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने हे पाणी आदिवासी वस्तीमध्ये पसरल्याने साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक नळ जोडणी असताना नागरिकांना दोन वर्षांपासून पाणी मिळालेले नाही. या सर्व मागण्यांसंदर्भात ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्यामुळे नागरिकांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते.

दरम्यान सायंकाळी या उपोषणाची दखल घेऊन सहाय्यक गटविकास अधिकारी शेख तसेच भाऊसाहेब गरुड यांनी गटविकास अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली व सूचना ग्रामपंचायतीला कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले त्यामुळे बर्डे यांच्या लेखी आश्वासनानंतर नागरिकांनी उपोषण मागे घेतले. या वेळी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव सोनवणे तालुकाध्यक्ष राम कृष्ण निकम यांसह आदिवासी बांधव उपस्थित होते.