मिशन शौर्य मोहीम यशस्वी, महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा

सामना ऑनलाईन । मुंबई

आश्रमशाळांत शिकणाऱया विद्यार्थ्यांना ‘मिशन शौर्य’ या मोहिमेच्या माध्यमातून स्वत:ची अनोखी ओळख निर्माण करून देण्याची संधी आदिवासी विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील नऊ विद्यार्थ्यांनी शुक्रवारी पहाटे एव्हरेस्टवर हिंदुस्थानचा झेंडा फडकवला. या मोहिमेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.

आदिवासी विद्यार्थ्यांना जगावेगळे ध्येय उराशी बाळगण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारता यावे यासाठी गेल्या वर्षी ‘मिशन शौर्य’ मोहीम सुरू करण्यात आली. पहिल्या मोहिमेत पाच विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करून साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. दुसऱ्या मोहिमेत सुग्रीव मंदे (बीड), सूरज आडे, अंतुबाई कोटनाके (चंद्रपूर), मनोहर हिलीम, अनिल कुंदे, हेमलता गायकवाड (नाशिक), चंद्रकला गावीत (धुळे), मुन्ना धिवार (अमरावती), केतन जाधव (पालघर) हे नऊ विद्यार्थी यशस्वी ठरले अशी माहिती आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी दिली.

अशी करून घेतली तयारी
महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळांत शिक्षण घेणाऱ्या 203 विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट चढाईसाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले. हैदराबादमधील भोंगीर येथे रॅपलिंग आणि रॉक क्लायंबिंग प्रशिक्षणात उत्कृष्ट ठरलेल्या 41 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यापैकी 30 विद्यार्थी ऍडव्हान्स माऊंटरिंग कोर्ससाठी निवडण्यात आले होते. दार्जिलिंग, सिक्कीम आणि लेह या ठिकाणी शिखर चढण्यासाठी उत्तम दर्जाच्या उपकरणांच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्यात आले होते. या संपूर्ण प्रशिक्षणात कायम उत्तम कामगिरी बजावणाऱया 11 विद्यार्थ्यांची निवड मिशन शौर्य एव्हरेस्ट मोहिमेसाठी करण्यात आली होती, असे मनीषा वर्मा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या