पु.ल.ना सासुरवाडीत आदरांजली; मधली आळी आणि अंतु बर्व्याला उजाळा

2

दुर्गेश आखाडे । रत्नागिरी

रत्नागिरीच्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष रहातात. रत्नागिरीच्या लोकांमध्ये लाल चिऱ्याचे, नारळी-फणसाचे, खाजऱ्या आळवाचे आणि फट म्हणतां प्राण कंठाशी आणाऱ्या सुपारीचे गुण आहेत, अशा शब्दात ‘रत्नांग्री’करांचे वर्णन करणारे रत्नागिरीचे जावई भाई अर्थात पु.ल.देशपांडे. पु.ल.च्या सासुरवाडीत त्यांचा जन्मशताब्दी सोहळा सुरु झालाय.गेली दहा वर्ष रत्नागिरीत पुलोत्सव साजरा करणाऱ्या आर्ट सर्कलने पु.ल.देशपांडे जन्मशताब्दी सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित केला.

बापू हेगिष्टेंच्या दुकानात पु.ल. ना भेटलेला अंतू बर्वा मराठी साहित्यात अजरामर झाला. नगरपालिकेच्या निवडणुकीत पडणारा अणु गोगटे…झापाच्या थिएटरात झाप बाजूला करून एकच प्यालाचा पहिला अंक पाहिल्यावर त्यावर आपलं मत मांडताना चार आण्यात पुढचं नाटक बघायला द्या, अशी मागणी करणार अंतु. कोरा दुधाचा चहा दिला म्हणून रत्नांग्रीच्या सर्व म्हशी तुर्तास गाभण काय? अशी मिश्किल विचारणा करणाऱ्या अंतु बर्व्याचे कंट्री विनोद सांगून पु.ल.नी पोटभर हसवलं. अंतु बर्वा आणि रत्नागिरीचे नातं साहित्य विश्वात अखंड राहिलं आहे. पु.ल.देशपांडे यांचा आज नव्याण्णवा जन्मदिवस. आजपासून पु.ल.देशपांडे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले. पु.ल.देशपांडे जन्मशताब्दी सोहळा महाराष्ट्रासह देशविदेशात साजरा होत असताना आपल्या लाडक्या जावयाला आदरांजली वाहण्यासाठी आज रत्नांग्रीकरही स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या आवारात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आर्ट सर्कलने दिपोत्सवाचे आयोजन केले. प्रत्येकाने एक दिवा प्रज्वलित करून पु.ल.ना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर पु.लं. नी संगीत दिलेल्या काही मोजक्या गीतांची मैफल सुप्रसिद्ध गायक राजाभाऊ शेंबेकर, गायिका अदिती करंबेळकर यांनी सादर केली. त्यांना तबला वादक गिरीधर कुलकर्णी आणि संवादिनी वादक हर्षल काटदरे संगीतसाथ दिली. निवेदन दिप्ती कानविंदे यांनी केले. त्यानंतर आशय सांस्कृतिक, पुणे यांच्या सौजन्याने सुधीर मोघे यांनी दिग्दर्शित केलेला ‘पु.ल. पट’ अर्थात “या सम हा” लघुपट दाखविण्यात आला.

साहित्याबरोबर सामाजिक कार्याला सलाम
पु.ल. आणि सुनीताबाई यांच्या दातृत्वाला सलाम करत सामाजिक मदतीचा उपक्रम या निमित्त राबविण्यात आला. पुलसुनीत#च्या माध्यमातून दिवाळी पाडाव्याच्या निमित्ताने सामाजिक संघटनाना ओवाळणीतून मदत करण्यात आली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही पुलसुनीत# मोहिम जगभर राबवून पु.ल.देशपांडे स्मृतीप्रित्यर्थ हे मदत कार्य केले जाणार असून पु.ल.देशपांडे आणि सुनीता देशपांडे यांचा सामाजिक मदतीचा पैलू जपला जाणार आहे.