तिरंगा सॅण्डविज रोल

लहान मुलांना सलाड खायला आवडत नाही. सॅण्डवीज मध्ये भाज्या घालून दिल्यात तरी ते त्यातल्या भाज्या बाजुला काढून ते नुसता ब्रेड आणि सॉस खातात. त्यामुळे मुलांना काकडी, गाजर अशा भाज्या खायला घालणे म्हणजे एक कसरतंच असते. म्हणूनच खास मुलांचा विचार करुनच हे तिरंगा सॅण्डविज रोल्स बनविलेले आहेत. हे रोल्स बनवायलाही सोप्पे व अगदी पौष्टिकही. मुलांच्या टिफीनसाठी हा एक चांगला पदार्थ आहे.

साहित्य- ब्रेड, गाजर, काकडी, चिज स्लाईस, सॉस, बटर, पुदीना चटणी (आवडत असल्यास) चाट मसाला, मीठ.

कृती – ब्रेडच्या कडा काढून त्यावर लाटने फिरवावे. ब्रेड पातळ करुन घ्यावा. गाजर व काकडी सोलण्याने सोलून घ्यावे. त्यानंतर त्याच सोलण्याने काकडी व गाजर उभे सोलत रहावे. अशाने त्याचे पातळ स्लाईस तयार होतील. लाटलेल्या ब्रेडवर बटर लावावा. आवडत असल्यास हलकिशी पुदिना चटणी लावावी. प्रथम ब्रेड भरुन काकडीचे पातळ स्लाईस व त्यावर गाजरचे पातळ स्लाईस ठेवावे. त्यावर थोडे मीठ व चाट मसाला भुरभुरावा. नंतर चीजचा स्लाईस ठेवावा. हलक्या हाताने ब्रेडचा रोल तयार करावा. रोल व्यवस्थित घट्ट बंद करुन घ्यावा. नंतर मधून कापून सर्व्ह करावा. तिरंग्याची सुंदर रंगसंगती तयार झाल्यामुळे मुले या सॅण्डवीजकडे लगेच ऍट्रक्ट होतात. व काकडी व गाजर पातळ कापून रोल केल्यामुळे त्यांना ते काढूनही टाकता येत नाहीत.