नयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण

3556

>> भास्कर तरे

जूनमध्ये थोडा पाऊस लागला अन् सर्वत्र हिरवळ पसरली की पावसाळी पिकनिकसाठी कुठे जायचे याची शोधाशोध सुरू होते. मग, प्रत्येकजण आपल्याला माहिती असलेल्या ठिकाणाची नावे पुढे सरकवत जातो. सगळेच एकदम चार्ज असतात. असणारच, पाऊस कोणाला नको असतो. एकदातरी मनसोक्त पावसात भिजावं अशी प्रत्येकाचीच इच्छा. त्यातही तुम्ही जात असलेलं ठिकाण वर्दळरहित असेल तर मग काय.. शरीरासह, मनही टवटवीत होणारच..

igatpuri-3

पावसाच्या रिमझिम पडणाऱ्या सरींसोबतच आम्ही आल्हाददायक इगतपुरीत पोहचलो. अगदी मुंबईपासून साधारण 120 किमीचं अंतर. जर रहदारी नसेल तर सहज साडेतीन तासाच्या कालावधीत हे अंतर गाठता येते. पडघा ते इगतपुरी महामार्गावर खड्डे नसल्याने गाडीचा एक्सलेटरवरील आपल्या पायाचा दाब आपोआप वाढत जातो, म्हणून नियमांच उल्लंघन नको. नियमात गाडी चालवा. रस्त्याच्या दुतर्फा सगळीकडे पसरलेली हिरवळ अन् येणाऱ्या पावसाच्या सरींनी आधीच मनाची मोरासारखी अवस्था झालेली असते अन घाटात पोहचताच तुम्हाला तेथे थांबून सेल्फीचा मोह आवरताच येत नाही. घाटमाथा व घाट जसा शालू नेसून जणू तुमच्या स्वागतासाठीच नटून राहिलाय असाच काहीसा फिल होतो. अर्थात, निसर्गाच्या सान्निध्यात जेव्हा आपण पोहचतो तेव्हाच आपल्याला आपल्या संपदेची जाणीव होते. काही कालावधीसाठी सर्व सोडून त्या मोकळ्या व स्वच्छ वातावरणातून परतूच नव्हे असेच वाटते.

igatpuri-4

धुक्यात रस्ता शोधत शोधत घाटमाथा गाठला. महामार्गाला पोहचताच आमची व्यवस्था ज्या एका खासगी ठिकाणी झाली होती तेथे पोहोचलो. ते ठिकाणही इतंक सुंदर की 15 लोकांचा ग्रुप सहज वास्तव्य करू शकतो. स्विमिंगपूलची व्यवस्था, कोणाचीही अडचण नाही, फक्त आणि फक्त तुमचीच मालमत्ता. आत स्विमिंगपूल, जेवणाची व्यवस्था असल्याने काही अडचण नाही, लागूनच खालच्या बाजूला नाशिकला जाणाऱ्या रेल्वेमार्गाचा ट्रॅक दिसतो व समोरही हिरवगार डोंगर आणि काही ठिकाणी भातशेती करणारी माणसं. जवळच तीन किलोमीटरला इगतपुरी स्टेशन व बाजार असल्याने काही हवं असेल तर तुम्ही जाऊन घेऊन येऊ शकता. एक दिवस पूर्ण मुक्काम झाल्यावर दुसऱ्या दिवशी जवळपास कुठे भटकंती करायची त्यावेळी तिथे असणाऱ्या मुलांनी सांगितले की जवळच धरण आहे व धरणालगतच धबधबाही.

igatpuri-21

मग, काय एक दिवस धम्माल झालीच होती. दुसरा दिवस सुरू झाला. सकाळी चहा-नाश्ता झाला आणि धरणाच्या दिशेने कूच सुरू झाली. महामार्गापासून डाव्या बाजूला ट्रॉपिकल रिट्रीट फार्महाऊसच्या दिशेने पुढे साधारण एक ४-५ किलीमीटर अंतरावर धरण आहे. गाड्या थेट धरणावर घेऊन जाता येतात त्यामुळे काही अडचण येत नाही. आम्ही गाड्या घेऊन धरणावर पोहचलो. वर गेल्यावर पाऊस, तर कधी धुक्याने समोरचं दिसणं अस्पष्ट व्हायचं तर क्षणात आभाळ मोकळं व्हायचं. असं वाटत की तासन तास तिथेच बसून राहावं. इतकं छान वातावरण. कामाचा ताण, मनाची घुसमट, दैनंदिन कामकाज सगळं विसरून स्वतःसाठी दिलेला वेळ या ठिकाणी आल्यावर नक्कीच सत्कारणी लागेल आणि तुमची पावसाळी पिकनिकची एक आठवण कायम स्मरणात राहिल असे हे ठिकाण म्हणजे भाऊली धरण. तुम्ही जर विकएण्ड पिकनिक प्लॅन करत असाल तर नक्की जा. आवडेल याची खात्री.

पर्यटनाचा आनंद घेताना काही नियमावली आवश्यक –

गेल्या १०-१२ दिवसात झालेल्या पावसाने नदीपात्र, धरणे, ओहळ आणि धबधबे सर्वत्र खळखळताना आपण पाहतो. तसे मुंबईहून कर्जत-पुण्याच्या दिशेने ट्रेनने तर भरपूरच अशी ठिकाणे पाहायला मिळतात. परंतु हल्ली प्रत्येक पावसाळी पर्यटनस्थळी वाढत असलेले अपघात चिंतेचा विषय ठरल्याने बंदी घातल्याने पर्यटकांची पंचायत झाली आहे. अर्थात, पर्यटकांनी काही मर्यादा पाळायला हव्यात. ज्या ठिकाणी तुम्ही आनंद लुटायला जात आहात तेथे गैरप्रकार होता कामा नये. आपण जसे मित्र मैत्रिणी जातो तसे तिथे अनेक फॅमिलीही येत असतात. त्यामुळे मद्यपान करून वातावरण दूषित करण्यापेक्षा काही नियमावली पाळली तर अशी बंदी येणार नाही व स्थानिक पर्यटनाला अशा घटनांचा फटका बसणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या