तलाकची समस्या, वस्तुस्थिती आणि सर्वेक्षण

>>मुजफ्फर हुसेन<<

m_hussain1945@yahoo.com

जगभरातील जवळपास प्रत्येक धर्मात अशी धारणा आहे की, पती-पत्नीचे नाते परमेश्वर स्वर्गातच ठरवत असतो. त्यामुळे पती-पत्नीने एकमेकांपासून वेगळे होण्याची कल्पना कोणत्याही धर्मात नाही. आता घटस्फोटाच्या प्रक्रिया प्रत्येक देशात झाल्या, पण त्यामागे धर्मसंस्कार नाहीत. इस्लाममध्ये मात्र तलाकची संकल्पना आहे आणि तीही एवढी सोपी सरळ आहे की त्यामुळे तलाक  ही एक गंभीर समस्याच झालेली आहे.

मुस्लिम समाज ज्या इस्लामी शरियतला मानतो त्या शरियतमधील दोन शब्दांना सध्या मोठे महत्त्व आले आहे ते शब्द म्हणजे निकाह आणि तलाक! हे दोन्ही शब्द अर्थानुसार परस्परविरोधी आहेत. मुस्लिम तरुण आणि तरुणींना जेव्हा विवाह करायचा असतो तेव्हा विवाहासाठी म्हणून जे मंत्र म्हटले जातात त्या संपूर्ण प्रक्रियेला निकाह म्हटले जाते. निकाहानंतरच मुस्लिम तरुण-तरुणी पती-पत्नी होतात. जेव्हा मुस्लिम पती-पत्नी एकत्र नांदूच शकत नाहीत त्यांना  एकमेकांपासून वेगळे व्हायचेच असते, तेव्हा जी प्रक्रिया राबवली जाते त्याला तलाक म्हणतात. जगात अशा अनेक धर्मसंस्कृती आहेत जेथे एकदा विवाह केला की घटस्फोट घेण्याची सोयच नाही. केवळ इस्लाम धर्मामध्येच विवाह विच्छेद स्वीकारलेला आहे त्यास तलाक संबोधलेले आहे. निकाहच्या वेळी वराकडून काही धनराशी किंवा एखादी मौल्यवान वस्तू भेट म्हणून वधू स्वीकारते त्याला मेहर म्हणतात. मेहरलासुद्धा निकाहच्या प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. वधूला वाटले की मेहरची गरज नाही तर ती यासाठी सूटही देऊ शकते. मात्र जेव्हा तलाक घेतला जातो तेव्हा मेहर परत करण्यासही तेवढेच महत्त्व असते.

मानवी समाज जीवनाची स्त्री आणि पुरुष ही दोन महत्त्वाची अंगे आहेत. त्यामुळे जगात विवाह आणि घटस्फोट, निकाह आणि तलाक याचे सहअस्तित्त्व नाहीच असा समाज आढळून येणे थोडे अशक्यप्रायच आहे. घटस्फोट जगभरातील सर्वच समाजात होतात, परंतु चर्चा मात्र मुस्लिम समाजातील तलाकचीच होते असे दिसून येईल. याचे कारण इस्लाममध्ये कोणत्या मुद्दय़ावर आणि कशा पद्धतीने तलाक होईल हे तलाक देणाऱया घेणाऱयांनाही सांगता येणार नाही. क्षणात तलाक होऊन जातो आणि मग वस्तुस्थिती समोर आली की दोघे भानावर येतात. मात्र तोपर्यंत दोघे एकमेकांसाठी परके झालेले असतात. त्यामुळेच तर ट्रिपल तलाक एक सामाजिक समस्या झालेली आहे. सामाजिक आणि राजकीय पातळीवर त्याची मोठी चर्चा आहे, त्याचबरोबर तलाकचा विषय आता न्यायालयातही गेलेला आहे.

ट्रिपल तलाकसारख्या प्रथेतून काहीतरी मार्ग काढला जावा असे तलाक घेणाऱयांना, एकूणच समाजाला वाटत असले तरी हा मार्ग काढला जाईपर्यंत दोघेही एकमेकांपासून कोसो दूर झालेले असतात. त्यामुळे ट्रिपल तलाक मुस्लिम समाजासाठी डोकेदुखी झालेली असून त्यातून मार्ग काढण्यासाठी विचारवंतांपासून मुस्लिम समाजातील प्रत्येक घटक या वाईट प्रथेपासून समाजाला कसे वाचवता येईल याचाच विचार करतो आहे. ट्रिपल तलाक ही राष्ट्रीय समस्या झालेली आहे. या विषयावर जेवढी चर्चा होत आहे तेवढाच हा रोग वाढतच चालला आहे. परंतु त्यावर उत्तर सापडत नाहीये. तलाकबाबत धर्मात काय म्हटले आहे हे प्रत्येक जण वेगवेगळे संदर्भ देऊन सांगत आहे.

हिंदू संस्कृतीत हा प्रकार नाही. हिंदूंसाठी घटस्फोटाला धर्म म्हणून कुठेच मान्यता नाही. त्यांना हा प्रकार मान्यच नाही. त्यामुळे अशा गोष्टींचा ते विरोध करीत असतात.  जगभरातील प्रत्येक धर्म तलाकच्या विरोधात असल्याचे दिसून येईल. हिंदूंप्रमाणेच ख्रिश्चन आणि यहुदींनासुद्धा तलाक समर्थनीय वाटत नाही. ख्रिश्चन धर्मात तर अशी धारणा आहे की, विवाह हे स्वर्गात ठरतात, पृथ्वीवर फक्त त्यावर अंमलबजावणी केली जाते. विविध धर्मात असे मानले जाते की, परमात्माच विवाह निश्चित करून ठेवतो. त्यामुळे जे स्वर्गातच निश्चित झालेले असते त्यात मानवाला हस्तक्षेप करायला कुठे वावच नाही. हिंदू धर्मात तर पत्नीला अर्धांगिनीच म्हटले जाते. केवळ इस्लाममध्ये तलाक अतिशय सोपा आणि लवचिक आहे. त्याशिवाय इतर कोणत्याही धर्मात तलाकची एवढी सहज सोपी प्रक्रिया नाही. याचे कारण एकदा का संस्कार म्हटले की तिथे वेगळेपणाची भावना येण्याचे कारणच नाही. याच संस्काररुपी सिद्धांतावर पती-पत्नी म्हणून मान्यता मिळते. आज जरी सर्वच समाजात घटस्फोटाला कायदेशीर मान्यता दिलेली असली तरी जगभर ही धारणा अतिशय ठाम आहे की, परमेश्वरानेच जोडपे ठरवले असेल तर त्याचा वेगळे होण्याचा प्रश्न येतोच कोठे? संस्कार हा संस्कृतीचा मूलभूत पाया असतो. संस्कारातून नैसर्गिक आस्था निर्माण होते. घटस्फोट किंवा तलाक ही काही नैसर्गिक गोष्ट नव्हे. विवाह संस्कार म्हटले म्हणजे त्यामागे धर्म व अध्यात्म येते. परंतु तलाक म्हटले की ती केवळ भौतिक प्रक्रिया ठरते. त्याचा धर्म किंवा अध्यात्माशी कसलाही संबंध नाही.

तलाक हा मूळ शब्द अरबी आहे. इतर धर्मात त्याला स्थान नाही. तलाकच्या मुद्दय़ावर सध्या देशात मोठी चर्चा सुरू आहे. मोठे वाद झडत आहेत. सामाजिक-राजकीय क्षेत्रातच नव्हे तर न्यायालयातही हा वाद पोहोचलेला आहे. आतापर्यंत मध्यपूर्वेतील इस्लामी राष्ट्रे हा विषय हिंदुस्थानातील अंतर्गत विषय असल्याचे मानून त्यावर प्रतिक्रिया देणे टाळत असे. परंतु यावेळी तेही सतर्कतेने निरीक्षण करीत आहेत. या वेळी प्रथमच विदेशी मीडियाही या विषयाकडे आकर्षित झालेला असल्याचे दिसून येते. लवकरच सर्वोच्च न्यायालय निकाह, ट्रिपल तलाक आणि हलाला या विषयावर सुनावणी घेणार आहे. अशा स्थितीत नुकताच एक सर्व्हे जाहीर झाला असून त्यातून तलाकबाबत एक वेगळीच वस्तुस्थिती समोर येते. हा सर्व्हे दिल्लीच्या सेंटर फॉर रिसर्च ऍण्ड डिफेन्स इन डेव्हलपमेंट पॉलिसी (सीआरडीडीपी) ने केलेला आहे. या सर्वेत एकूण म्हणजे २०,६७१ मुस्लिमांचा सर्व्हे करण्यात आला. त्यात १६,८६० पुरुष आणि ३,८११ महिलांचा समावेश होता. लाखो लोकांनी दिलेल्या ऑनलाइन माहितीअंती या निवडक लोकांची सर्व्हेसाठी निवड करण्यात आली होती. डॉ. अबू सालेह शरीफ यांच्या नेतृत्वाखाली हा सर्व्हे झाला.  डॉ. शरीफ हे एकेकाळी सच्चर समितीचे सदस्य होते. या सर्व्हेच्या अहवालात तलाकबाबत जे निष्कर्ष काढण्यात आले ते असे आहेत की, तलाक घेणाऱयांपैकी ४६ टक्के पुरुष आणि ३९ टक्के महिलांचे किमान प्राथमिक शाळेपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले होते. तलाक दिलेल्या ५८ टक्के महिलांकडे रोजगाराचे कसलेही साधन नव्हते. ५० टक्के महिला या केवळ घरकाम करणाऱ्या होत्या. तलाक घेणाऱ्यापैकी ३१ टक्के पुरुषांकडे रोजगाराचे काहीतरी साधन होते, त्यांची मासिक कमाई ही दहा हजारांपासून २९ हजारांपर्यंत होती. १३.२७ टक्के मुस्लिमांनी असे स्पष्ट केले की, पिता किंवा नातेवाइकांनी कान भरल्यामुळे तलाक घेण्याची वेळ आली. ८.४१ टक्के प्रकरणांत तलाकचे हुंडा हे कारण आढळले. ७.९६ टक्के तलाक हे पतीचे इतर महिलांशी असलेले संबंध या कारणामुळे झालेले होते. पत्नीला मूल न होण्यामुळे ७.०८ टक्के जणांचे तलाक झाले. आश्चर्य असे की, या सर्व्हेनुसार रागाच्या भरात ट्रिपल तलाकची पद्धत वापरून म्हणजे एकाच वेळी तीन वेळा तलाक तलाक तलाक असे म्हणून घेतल्या गेलेल्या तलाकची टक्केवारी केवळ ०.४४ टक्के एवढीच आहे. केवळ ०.८८ टक्के प्रकरणात पतीने दारूच्या नशेत तलाक दिलेला असल्याचे आढळते.  या सर्व तलाकची मूळ कारणे ही विविध प्रकारच्या समस्या असल्याचे दिसून आले आहे.