पेट्रोल पंपात घुसला ट्रक

सामना प्रतिनिधी । न्हावा-शेवा

उरण तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा असलेल्या जीडीएल कंपनीजवळच्या एचपी पेट्रोल पंपात ट्रक घुसल्याने कर्मचाऱ्यांसह येथे पेट्रोल टाकण्यासाठी आलेल्यांची चांगलीच पळापळ झाली. या भरधाव ट्रकने डिझेल भरण्यासाठी असलेल्या दोन पंपाचा चक्काचुर केला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी पेट्रोल पंपाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. एमएच ४६ एआर ४५४० हा ट्रक जीडीएल कंपनीजवळील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आला होता. मात्र चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे या ट्रकने पंपावरील दोन डिझेल पंपाना धडक दिली. या जबरदस्त धडकेमुळे ट्रकसह दोन पंपाचीही नासधुस झाली. पेट्रोल पंपाच्या कोपऱ्याला हा ट्रक अडकल्याने पुढील अनर्थ टळला. सुदैवाने शॉर्ट सर्किटसारखा कोणताही प्रकार न घडल्याने मोठी दुर्घटना टळली. सदर प्रकरणाची उरण पोलिस ठाण्यात मोटार अपघात म्हणून तक्रार दाखल करण्यात आली आहे.