लातूरमध्ये ट्रक- टेम्पो च्या धडकेत दोन ठार

सामना प्रतिनिधी। नांदेड

नांदेड नागपूर महामार्गावरील हदगांव जवळ बुधवारी सकाळी पैनगंगा नदीवरील पूलावर दुधाच्या पिकअप जीपला मागून वेगाने येणाऱ्या गव्हाच्या ट्रकची धडक बसली. यात दोन जण ठार झाले आहेत. समीर खाँ (२६) कुणाल (२०) अशी या दोघांची नावे आहेत. ऐन सकाळी हा अपघात झाल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
बुधवारी सकाळी लातूरच्या साई कंपनीचा दुधाचा टेम्पो नांदेड नागपूर महामार्गावरुन निघाला होता. टेम्पोच्या पुढे वाळू-विटांनी भरलेला एक ट्रक जात होता. त्यावेळी अचानक चालकाने रस्त्यातच ट्रक थांबवला. यामुळे मागून येणारा टेम्पो त्यावर धडकला. दोन्ही चालक रस्त्यावर उतरुन भांडू लागले. हा वाद सुरु असतानाच गव्हाने भरलेला एक ट्रक वेगाने येत टेम्पो व ट्रकवर आदळला. यात टेम्पोचा चक्काचूर झाला व त्याच्याजवळ उभे असलेले समीर व कुणाल यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयंकर होता कि ट्रक व टेम्पो दरम्यान अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना जेसीबीची मदत घ्यावी लागली.

दरम्यान या पूलावर याआधीही अपघात झाले आहेत. यामुळे पुलाला कठडे बांधावेत अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.