‘स्त्री’ चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित?

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा नुकताच रिलीज झालेला ‘स्त्री’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. हॉरर कॉमेडी असलेला हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे समजते. कर्नाटकमधील एका छोट्या गावात अशाच प्रकारच्या घटना ९० च्या दशकात घडत होत्या. त्या घटनांवरूनच ‘स्त्री’ हा चित्रपट तयार केल्याचे बोलले जाते.

या चित्रपटातील कथेनुसार, चंदेरी गावातील देवीची दरवर्षी चार दिवस पूजा चालते. त्या चार दिवसात एक ‘स्त्री’ भूत एका पुरुषाला स्वत:सोबत घेऊन जाते. जाताना मागे फक्त त्याचे कपडे ठेवून जाते. ही स्त्री म्हणजे एकेकाळची एक सुंदर वेश्या असते. त्या वेश्येचे एका पुरुषावर प्रेम असते, तो देखील तिच्यावर प्रेम करत असतो. ते लग्नही करतात. मात्र गावकऱ्यांना ते पटत नाही. त्यामुळे लग्नाच्या पहिल्या रात्रीच गावकरी तिच्या नवऱ्याची व तिची हत्या करतात. तेव्हापासून ‘ती’ गावकऱ्यांचा बदला घेण्यासाठी दरवर्षी पुजेच्या काळात चार दिवस गावात येते. दर दिवसाला एका पुरुषाला घेऊन जाते. तिच्यापासून वाचण्यासाठी गावातील प्रत्येकजण आपल्या घराबाहेर ‘ओ स्त्री कल आना’ असे लिहून घेतो. ज्याच्या घराबाहेर असे लिहलेले नसेल त्याच्या घरातील व्यक्तीला स्त्री घेऊन जाते. असे या चित्रपटात दाखवले आहे.

nale-ba

हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याची सूचना या चित्रपटाच्या सुरुवातीला देण्यात आली आहे. ही घटना कर्नाटकमधील बंगळुरूतील एका गावात १९९० च्या दशकात घडलेली आहे. त्यावेळी त्या गावात एका महिलेचे भूत रात्रीच्यावेळी घरातील पुरुषाच्या नावाने हाक मारायचे. त्यावर कोण आहे असे विचारल्यावर त्या पुरुषाच्या जवळच्या व्यक्तीचे नाव सांगायची. यात बऱ्याचदा त्या पुरुषाच्या आईचे नाव घेतले जायचे. जर त्या पुरुषाने दरवाजा उघडला तर त्या पुरुषाचा २४ तासाच्या आत मृत्यू व्हायचा. यावर उपाय म्हणून त्या गावातील गावकऱ्यांनी त्यांच्या दाराबाहेर कानडी भाषेत ‘नल्ले बा’ असे लिहायला सुरुवात केली होती. नल्ले बा म्हणजे ‘उद्या या’. ज्या व्यक्तीच्या घराबाहेर नल्ले बा लिहलेले असेल त्या व्यक्तीचे त्या भूतापासून संरक्षण व्हायचे असे बोलले जाते. आजही या गावातील घराबाहेर नल्ले बा लिहलेले दिसते.

बंगळुरूत साजरा होतो नल्ले बा दिवस
बंगळुरुत आजही १ एप्रिलला ‘नल्ले बा’ दिवस साजरा होतो. या दिवशी प्रत्येक जण त्यांच्या घराबाहेर नल्ले बा लिहून घेतो असे बोलले जाते.