ट्रूकॉलरचे पेमेंट फीचर

सध्या सर्वच आघाडीच्या ऍप्समध्ये विविध फीचर्स देण्याची चढाओढ चालू आहे. ट्रूकॉलर या डायलिंग ऍपनेदेखील या स्पर्धेत उडी घेत आपल्या ग्राहकांसाठी पेमेंट फीचर दाखल केले आहे. ट्रूकॉलरच्या सर्वच यूजर्सला आणि विशेषतः छोटय़ा स्तरावरील व्यापारीवर्गाला याचा मोठा फायदा होणार आहे. या फीचरमध्ये यूजर आपला वैयक्तिक ‘युनिक व्हर्च्युअल पेमेंट ऍड्रेस’ तयार करून त्यानंतर सरकारच्या यूपीआय सिस्टमच्या मदतीने पैशाची देवाणघेवाण पूर्ण करू शकणार आहे. ट्रूकॉलरद्वारे होणारे हे व्यवहार तुम्ही पुरवलेल्या बँक खात्याशी थेट जोडले जाणार आहेत. अशा प्रकारे पैसे मागण्यासाठी पाठवलेला मेसेज हा समोरील व्यक्तीला नोटिफिकेशनच्या स्वरूपात प्राप्त होणार आहे. हे नोटिफिकेशन उघडून आणि आपल्या एमपिनचा वापर करून सदर व्यक्ती पेमेंट सहजपणे करू शकेल. हा पैसे मागवणारा मेसेज नोटिफिकेशनच्या जोडीलाच शेअरेबल लिंक अथवा एसएमएस ई-मेलच्या रूपातदेखील पाठवता येणे शक्य असणार आहे.