मेक्सिको सीमेवर भिंत उभारण्यासाठी अमेरिकेत आणीबाणी घोषित

सामना प्रतिनिधी । वॉशिंग्टन

अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्यास मोठा विरोध आहे; पण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ही भिंत उभारण्यावर ठाम आहेत. त्यासाठी ट्रम्प यांनी पुढचे एक पाऊल टाकले आहे. ही भिंत उभारण्यासाठी ट्रम्प यांनी शुक्रवारी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. त्याचबरोबर सरकारी शटडाऊन रोखण्यासाठी ट्रम्प यांनी एका खर्च विधेयकावरही स्वाक्षरी केली आहे.

या मेक्सिको भिंतीसाठी ट्रम्प यांनी 5.7 अब्ज डॉलर्सची म्हणजे सुमारे 40 हजार कोटी रुपये सुरुवातीस मागणी केली होती. आता मेक्सिको सीमेवर अडथळे किंवा कुंपण उभारण्यासाठी 1.375 अब्ज डॉलर्स खर्च करण्याचा प्रस्ताव आहे.

दुर्मिळ घटना ठरणार
अमेरिकेत आणीबाणीची घोषणा ही एक दुर्मिळ घटना आहे. या घोषणेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विशेष अधिकार मिळणार आहेत. या अधिकाराद्वारे ट्रम्प हे लवकर आणि आपत्कालीन सहाय्य निधीमधील काही निधी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्यासाठी खर्च करू शकणार आहेत.

कोर्टात आव्हान?
विरोधी पक्षाचे डेमोक्रॅटचे नेते आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणास सातत्याने कडाडून विरोध करणारे नैंसी पेलोसी म्हणाले, अशा प्रकारच्या निर्णयाने राष्ट्राध्यक्षांना मिळणाऱ्या अधिकाराचा हा दुरुपयोग आहे. सीमेवर आणीबाणीसारखी परिस्थिती नाही. पेलोसी यांनी यापूर्वीही ट्रम्प यांच्या यासारख्या निर्णयांना कोर्टात आव्हान देणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे ट्रम्प यांनी देशात आणीबाणी घोषित केल्याने त्याला न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे हे स्पष्ट होत आहे.