अमेरिकेच्या हितावर हल्ल्याचा प्रयत्न केला तर इराणला नष्ट करू! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

8

सामना प्रतिनिधी । वॉशिंग्टन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला आहे. इराणने अमेरिकेच्या हितावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर इराणला नष्टच करू अशी धमकी ट्रम्प यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. इराणला लढायचेच असेल तर त्यांचा शेवट करू. पुन्हा अमेरिकेला धमकी देण्याची हिंमत करू नका, असेही ट्रम्प यांनी बजावले आहे.

अमेरिकेने आखाताच्या समुद्रात आपल्या युद्धनौका आणि बी-52 बॉम्बर किमाने तैनात केली आहेत. इराणचे समर्थन असलेल्या सशस्त्र इराकी गटांकडून धोका असल्यामुळे ट्रम्प प्रशासनाने अनावश्यक राजनैतिक कर्मचारीवर्गाला इराक सोडण्यास सांगितले आहे. बगदादच्या ग्रीन झोन हाऊसिंगमधील सरकारी कार्यालये आणि दूतावासांवर रविवारी रॉकेट डागण्यात आली. यात अमेरिकन दूतावासाचाही समावेश होता. या हल्ल्यामागे कोण आहे ते अद्यापि स्पष्ट झालेले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोलटॉन हे इराणविरोधात कठोर भूमिका घेण्याच्या मताचे आहेत, तर प्रशासनातील अन्य व्यक्ती त्याविरोधात आहेत. “अमेरिकन अध्यक्षांचे बोल इराणला संपवू शकत नाहीत. इराणवर गेल्या 2000 वर्षांत आलेल्या अनेक आक्रमणांतून इराणी नागरिक उभे राहिले आहेत. आर्थिक दहशतवाद आणि वांशिक हत्येच्या वल्गना इराणला संपवू शकत नाहीत. इराणला धमकी देऊन नव्हे तर आदराने वागवा. त्याचा उपयोग होईल,” असे इराणचे परराष्ट्र व्यवहारमंत्री, मोहम्मद जावाद झरीफ यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या