शेवटच्या मिनीटापर्यंत शिवसेनेबरोबर युतीसाठी प्रयत्न करु – रावसाहेब दानवे

2

सामना प्रतिनिधी । कराड

भाजप-शिवसेनेने मागच्या लोकसभा निवडणुका महाराष्ट्रात एकत्र लढल्या. याही निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्र लढाव्यात अशी भाजपची भूमिका आहे. मताचे विभाजन होवू नये. यासाठी आम्ही शेवटच्या मिनीटापर्यंत युतीसाठी प्रयत्न करु. शेवटी भाजपाबरोबर युती करायची का नाही हा शिवसेनेचा वैयक्तीक प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सातारा लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे प्रदेश प्रतिनिधी भरत पाटील, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, शिवसेनेच्या नेत्यांनी टिका करण्यापेक्षा मतभेद असतील तर समोर येवून चर्चा करावी. चर्चेतून मतभेद मिटवावेत. चर्चेची दारे खुली आहेत असेही रावसाहेब दानवे म्हणाले, राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता भाजपने 48 लोकसभा मतदार संघात तयारी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्षाच तत्कालीन नेते प्रमोद महाजन, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी युती निर्माण केली आहे. महाराष्ट्रात आम्ही मागच्या लोकसभा निवडणुका एकत्र लढल्या. याही निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्र लढाव्या अशी भाजपची भुमिका आहे. रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले.

सातारा लोकसभेसाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी कोणतीही चर्चा आलेली नाही असे स्पष्ट करून ते म्हणाले, मलकापूर नगरपरिषद निवडणूकीची माहिती घेतली असून याठिकाणी आमचाच विजय होईल.