​थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी एटीएम फोडण्याचा प्रयत्न

सामना प्रतिनिधी । पुणे

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी चक्क स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्यांच्यात सतरा वर्षीय एका साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्यातील राजेंद्रनगर येथे ही घटना घडली. प्रसाद शुक्राचार्य जगताप (वय २०) आणि त्याचा भाऊ प्रशांत शुक्राचार्य जगताप अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विजय आढारी यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

प्रसाद, प्रशांत हे दोघे भाऊ आणि त्यांचा अल्पवयीन साथीदार हे तिघेही राजेंद्रनगरमधील पीएमसी कॉलनीत एकाच इमारतीत राहतात. जगताप यांचे वडील वॉचमन म्हणून काम करतात. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी त्यांना पैशाची गरज होती व त्यासाठी त्या तिघांनी मिळून चक्क बँकेचे एटीएम फोडण्याचे ठरविले. राजेंद्रनगर परिसरातील शिल्पा कॉर्नर सोसायटीत स्टेट बँकेचे एटीएम सेंटर आहे. काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ते तिघेही एटीएमजवळ गेले. त्यांनी स्क्रू-ड्रायव्हर आणि पक्कडच्या साहाय्याने हे एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या पोलिसांच्या हा सर्व प्रकार लक्षात आला. व त्या पोलिसांना त्या तिन्ही आरोपींना अटक केली. आरोपींकडून स्क्रू-ड्रायव्हर व पक्कड जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील यांनी दिली. याप्रकरणाची सविस्तर चौकशी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील व हवालदार शरद वाकसे करीत आहेत.