तुळस


तुळस शास्त्रीयदृष्टय़ा एक वनस्पती… पण काळ कितीही पुढे गेला तरी तुळस आपल्यापैकी प्रत्येकीच्या मनाच्या अगदी जवळ असते. घर लहान असो वा मोठे, अंगण असो वा गॅलरी. कितीही दाटीवाटीत तुळशीचे चिमुकले अस्तित्व अबाधित असते. सकाळी तुळशीला पाणी घालणे, संध्याकाळी शक्यतो एखादी उदबत्ती तरी तिच्या मऊसुत मातीत रोवली जातेच.

त्याग, समर्पण, सोशिकता, खंबीर कणखरपणा… बाईपणाचे सारे गुण तिच्या ठायी एकवटतात. म्हणूनच कदाचित ती आपल्यापैकी प्रत्येकीच्या सुखदुःखातील सोबती असावी.

पुराणात, आयुर्वेदात आणि आरोग्यशास्त्रात पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगितले आहे. याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते. जालिंदर नावाच्या पराक्रमी राक्षसाने आपल्या पराक्रमाच्या बळावर देव आणि साधूंना त्राहीत्राही करून सोडले होते. त्याला रोखण्यासाठी देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून रक्षण होण्यासाठी विनंती करतात. तेव्हा देवांना असे कळते की, जालिंदराची पत्नी वृंदा ही पतिक्रता असून तिच्या पातिक्रत्याच्या सामर्थ्यानेच जालिंदर विजयी होत आहे. त्याला पराभूत करण्यासाठी वृदांच्या पातिक्रत्याचा भंग करावा लागेल. तरच जालिंदराचा मृत्यू होईल, मात्र असे करण्यास कोणीही देव धजावत नाही. अखेर श्रीविष्णू ती जबाबदारी स्वीकारतात. जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदाच्या महालात जातात. आपले पती आहेत असे समजून वृंदा त्यांना आलिंगन देते. तेव्हा तिच्या पातिक्रत्याचा भंग होतो आणि आणि देवांनी मारलेल्या बाणांनी जालिंदराचे शीर तुटून वृंदेच्या दारात पडते. नवऱयाचे शीर पाहताच ती चकित होऊन विष्णूंना विचारते, तू कोण आहेस? त्यावर विष्णू आपल्या खऱया रूपात प्रकटतात. संतप्त वृंदा त्यांना दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला तसा तुला तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, असा शाप देते. श्रीविष्णू तिची क्षमा मागतात आणि जे रोज तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल असे सांगतात. त्यानंतर वृंदा सती जाते. पुढे राम अवतारात श्रीविष्णूंना सीतेचा विरह सहन करावा लागला. श्रीविष्णूंना दिलेल्या शापामुळे ते दगड होऊन पडतात. त्यालाच आपण ‘शाळिग्राम’ असे म्हणतो. तसेच ज्या ठिकाणी वृंदावर अंत्यसंस्कार होतात. तिथे एक रोप उगवते. हे रोप म्हणजेच ‘तुळस’.

ज्या ठिकाणी तुळस लावली जाते. त्याला तुळशी वृंदावन असे म्हणतात. हे नाव वृंदाच्या नावावरूनच पडले आहे. हीच तुळस श्रीकृष्ण आणि पांडुरंगाने धारण केली आहे. श्रीविष्णूनेही तिचा स्वीकार केला आहे. याचे प्रतीक म्हणून ‘शाळिग्राम’ला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो. वारकऱयांनीही तुळशीला पूज्य मानले आहे. अनेक धार्मिक कार्यामध्ये तुळशीचा वापर केला जातो, कारण ती विष्णूंना प्रिय असून तिचा वापर धार्मिक कार्यात करणाऱयावर भगवंताची कृपा असते, असे मानले जाते. यामुळे घरोघरी अंगणात तुळस लावली जाते.

औषधी गुणधर्म

तुळशीची पाने दही किंवा गोड़ ताकाबरोबर खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन शरीर प्रमाणबद्ध राहते, वजन कमी होते. वजन कमी झाले तरी थकवा येत नाही.

तुळशीत मानसिक ताण कमी करण्याचाही गुण आहे.

अंगणात तुळस लावली तर छोटय़ा आजारांपासून सुरक्षित राहता येते आणि प्रतिकारशक्तीही वाढते.

रोज सकाळी स्नान केल्यावर तुळशीसमोर दीर्घ श्वसन केल्यास आरोग्य मिळेल.

उष्णतेच्या विकारात तुळशीचे बी पाण्यात घालून त्याची खीर औषध म्हणून खातात.

अर्धांगवायू आणि संधिवात यामध्ये तुळशीच्या पानांच्या काढय़ाची वाफ घेतात.

निद्रानाशावर काळ्या तुळशीच्या पानांच्या गोळ्या गुणकारी.

तुळशीची पाने खाल्ल्याने एकाग्रता वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांना तुळशीच्या पानांचे सेवन गुणकारी आहे.

तुळशीची पाने डासांना दूर पळवतात.

वैज्ञानिक महत्त्व

तुळस पहाटेच्या वेळी ०.०३ टक्के इतका ओझोन वायू सोडते. या वायूच्या संपर्कात व्यक्ती आल्यास त्याच्या मेंदूत 5HTpn- सेरॉटोनीन नावाचे संप्रेरक स्रवते. ज्यामुळे व्यक्ती दिवसभर प्रसन्न आणि आनंदी राहते. त्याची रोगप्रतिकारशक्तीही वाढते. तिच्यातील शुभ स्पंदनांमुळे वातावरण शुद्धी होते. आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी, खोकला, ताप, त्वचारोग इत्यादी अनेक लहान-मोठय़ा आजारांपासूनही रक्षण होते. तुळशीच्या मंजिरी, मुळे, खोड, पाने हे सर्वच औषधी आहेत.

तुळशी पूजन रोज करावे!

सकाळी देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वी रोज तुळशीपूजन करावे. संध्याकाळी तिच्यासमोर दिवा लावावा. तुळशीचे झाड सुकल्यावर ते लगेच बदलून नदी किंवा तलावात विसर्जित करावे. रात्रीच्या वेळी तुळशीची पाने काढू नयेत.

तुळशीपूजनाचे महत्त्व

घरातील स्त्रीयांनी तुळशीपूजन करून घरातील कामांना सुरुवात करावी. तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे घरात सुख-शांती नांदते तसेच तुळशीमध्ये औषधीय गुणधर्मही आहेत. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. आपल्याला एखादी वस्तू अर्पण करायची असल्यास ती तुळशीच्या मुळाशी अर्पण करतात म्हणजे ती इष्ट देवतेकडे पोहोचते, अशी समजूत आहे.