बारदानाअभावी तूर खरेदी केंद्र बंद करण्याची वेळ

4

सामना प्रतिनिधी । निलंगा

शासनाने सुरु केलेल्या बाजार समितीच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर बारदानाची कमतरता, वजन केलेला माल नेण्यासाठी वाहतूक व्यवस्थेची वेळेत सुविधा न देणे व शेतकऱ्यांचे बील देयक उशीरा मिळणे यासाठी शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने याबाबत सहकार्य न केल्यास बाजार समितीतर्फे हरभरा खरेदीचे हमीभाव केंद्र चालू करणार नाही, अशी तंबी बाजार समितीचे सभापती अशोक पाटील निलंगेकर यांनी दिली.

मागील दोन महिन्यापासून बाजार समितीच्या वतीने हमीभाव तूर खरेदी केंद्र चालू आहे. ४२३१ शेतकऱ्यांनी ऑनलाईन तुरीची नोंदणी केलेली आहे. १२ मे पर्यंत १५४७ शेतकऱ्यांची तूर खरेदी केली आहे तर २६८४ शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे शिल्लक आहे. खरेदी केलेली तूर २१,३२६ क्विंटल आहे. तालुक्यात औराद शहाजानी व कासार सिरसी या बाजारपेठेसाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने निलंगा खरेदी केंद्रावर मोठा ताण आलेला आहे. त्यात शासनाकडून वेळेत बारदान न मिळणे व वाहतूक व्यवस्थेची सुविधा उपलब्ध न केल्याने माल खरेदी करण्यात अडचणी निर्माण होत आहे. परिणामी या दिरंगाईने शेतकऱ्यांना तूर खरेदीला आपला नंबर लागेपर्यंत बाजारात माल आणलेल्या वाहनासह चार-चार दिवस मुक्काम करावा लागत आहे.

२८ मार्च ते १८ एप्रिलदरम्यान ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी १५ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत खरेदी होईल. राहिलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी मुदतवाढ मिळाल्यास होणार असल्याचे अशोक पाटील निलंगेकर यांनी सांगितले. वाहतूक, हमाली व कमिशनपोटी बाजार समितीचे शासनाकडून २६ लाख येणे बाकी आहे. शासनाकडून बारदाना वेळेत न मिळाल्याने बाजार समितीने स्वतःच्या पैशातून १ लाख रुपयाचे २००० कट्टे खरेदी केल्याने हमीभाव केंद्र चालू आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री, पणनमंत्री व पणन संचालक यांना पत्र लिहिणार असून शासनाने वेळेत न केल्यास बाजार समितीकडून हमीभाव हरभरा खरेदी केंद्र चालू करणार नाही, असा इशारा अशोक पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या