अति आनंदाच्या भरात उडी मारायला गेला आणि जीवाला मुकला

सामना ऑनलाईन । अंकारा

वाढदिवस लक्षात राहण्यासाठी उडी मारताना फोटो काढायच्या धाडसामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हलिल डग असं या माणसाचं नाव आहे. उडी मारल्यानंतर तोल गेल्याने १५० फूट खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

हलिल आपला ३९वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांना घेऊन तुर्कीच्या दक्षिणेला असलेल्या उर्फा कॅसल इथे गेला होता. तिथे असलेल्या एका खडकावर उभा राहून तो आपले फोटो काढून घेत होता. पोझ देताना उत्साहाच्या भरात त्याने खडकावरून खाली उडी मारली. जमिनीवर येताच हलिलचा तोल गेला आणि तो त्याच्या मागे असलेल्या १५० फूट खोल दरीत जाऊन कोसळला. उडी मारल्यानंतर डगमगणाऱ्या हलिलला पकडायला त्याचे मित्र धावले पण तोवर तो खाली कोसळला होता.

पाहा व्हिडिओ-

गंभीर जखमी झालेल्या हलिलला त्याच्या मित्रांनी त्वरित स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार घटना घडली त्या ठिकाणी जर रेलिंग किंवा कठडा असता, तर हे घडलं नसतं.