नागपुरात भरला जुळ्यांचा मेळावा


सामना प्रतिनिधी । नागपूर

नागपुरात रविवारी 9 तारिख आणि नवव्या महिन्याचे औचित्य साधून जेसीआय ऑरेंज सिटीच्या वतीने जुळ्या मुलांचा मेळावा आयोजित केला होता. मध्यप्रदेश, हैदराबादसह देशभरातून 202 जुळे या मेळाव्यात सहभागी झाले होते. लहान मुलांपासून ते 80 वर्ष वयाचे जुळे आजी- आजोबाही या स्पर्धेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेशभूषा करून सहभागी झाले होते.

नागपुरच्या जेसीआय ऑरेंज सिटी संस्थेतर्फे गेल्या 15 वर्षांपासून जुळ्यांच्या संमेलनाचे आयोजन केलं जात आहे. रविवारी नागपुरमधील महाल येथील राजवाडा पॅलेसमध्ये या अनोख्या संमेलनाचे आयोजन केले होते. यामध्ये आबाल वृद्ध जुळ्या बहिण-भावांनी रॅम्प वॉक करत आपली अदाकारी पेश केली. त्यामुळे बच्च्ये कंपनीपासून ते वृद्धांपर्यंत आनंदाचे वातावरण होते. या संमेलनात शुन्य ते चार वर्ष वयोगटात प्रेयसी व श्रेयसी दास या जोडीला प्रथम, तर उन्नती व उमंग कारीया या जोडीला द्वितीय आणि ओवी व आरोही सारंग यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. चार ते सात वर्ष वयोगटात शनाया व इशाना शर्माला प्रथम, श्लोक व शौर्य जैस्वालला द्वितीय आणि अन्वी व अवनी शिंदे जोडीला तृतीय, 7 ते 13 वर्ष वयोगटात प्रीत व पलक आनंदी आणि आरव व निरव चांडक या जोडींना प्रथम, आरव व अर्णव अभयकुमार मून जोडीला द्वितीय आणि अनंत व आरुष पुरोहित जोडीला तृतीय पुरस्कार, 13 ते 19 वर्ष वयोगटात कोयणा व कनिष्का मेश्राम जोडीला प्रथम, रिद्धी व सिद्धी देवगीरकर जोडीला द्वितीय व वेदांत व मृदंड वंजारी जोडीला तृतीय आणि 19 वर्षावरील वयोगटात प्रणव व प्रणोती कुळकर्णी जोडीला प्रथम, श्रद्धा व सुवर्णा शास्त्री जोडीला द्वितीय आणि शकिर व झकिर खानवाले जोडीला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.