ऑक्सफर्ड विद्यापिठात दाखवला जाणार ‘पॅडमॅन’

1

सामना ऑनलाईन । मुंबई

आर. बल्की दिग्दर्शित ‘पॅडमॅन’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ट्विंकल खन्नाने या चित्रपटाची निर्मिती केली असून आता ऑक्सफर्ड विद्यापीठातदेखील हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरू आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये ट्विंकल खन्नाला आमंत्रित करण्यात आले आहे. महिलांच्या मासिक पाळीविषयी असलेले प्रश्न, मासिक पाळीविषयी असलेल्या रुढी-परंपरांविरुद्ध लढण्याविषयी तसेच याविषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन याविषयी ट्विंकल विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर ‘पॅडमॅन’चा विशेष शो दाखवण्यात येणार आहे.

हा चित्रपट खेड्यातील स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणाऱ्या कोईम्बतूर येथे राहणाऱ्या अरुणाचलम मुरूगनाथ यांच्या जीवनावर आधारित आहे. हा बहुचर्चित चित्रपट येत्या २६ जानेवारीला प्रदर्शित होणार असून ऑक्सफर्ड विद्यापीठात दाखवला जाणारा ‘पॅडमॅन’ हा पहिला बॉलिवूड चित्रपट असणार आहे.