फेसबुक पाठोपाठ आता ट्विटरचाही डेटा लिक

सामना ऑनलाईन । मुंबई

डेटा लिक प्रकरणी फेसबुक पाठोपाठ आता ट्विटरही केम्ब्रिज अॅनालिटीकासोबत अडकल्याचे सांगण्यात येत आहे. केम्ब्रिज अॅनालिटीकाने बेकायदेशीररित्या फेसबुकवरील ८.७ कोटी युजर्सचा डेटा चोरला होता. या प्रकरणी युजर्सच्या प्रायव्हसीवरून प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. आता फेसबुक पाठोपाठ ट्विटरचा डेटाही सुरक्षित नसल्याचे सांगितले जात आहे. द संडे टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरनेही केम्ब्रिज अॅनालिटीकाला युजर्सचा डेटा विकला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, नेमक्या किती युजर्सचा डेटा लीक झाला आहे याचा आकडा समोर आलेला नाही.

रिपोर्ट नुसार, फेसबुक डेटा लीक करणारा आणि केम्ब्रिज अॅनालिटीकामध्ये काम करणारा अॅलेक्सॅण्ड्र कोगनने २०१५ मध्ये ट्विटरवरुन युजर्सचा डेटा खरेदी केला होता. कोगन याने ट्विटरचा डेटा मिळवण्यासाठी जीएसआर (ग्लोबल क्विज रिसर्च) नावाचं कमर्शियल फर्म सुरु केलं होतं. याप्रकरणी ट्विटरने स्पष्टीकरण देत केम्ब्रिज अॅनालिटीका आणि जीएसआरसारख्या कंपन्यांच्या जाहिराती घेणंही बंद केलं असल्याचं सांगितलं. ट्विटरच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कोणताही डेटा चोरला गेला नाहीये आणि त्याची विक्रीही करण्यात आलेली नाही.

काय आहे फेसबुक डेटा लिक प्रकरण?

अमेरिकेमध्ये २०१६ साली झालेल्या अध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणारी ब्रिटीश फर्म कॅम्ब्रिज अॅनालिटीकावर फेसबुकवरील तब्बल ५ कोटी युझर्सची वैयक्तिक माहिती चोरण्याचा आरोप आहे. हिंदुस्थानात होणाऱ्या निवडणुकांसाठीही अशाचप्रकारे डाटा वापरण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. अनेक कंपन्या आपले प्रोडक्ट विकण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर डेटा खरेदी करतात. असे करणे म्हणजे युजर्सच्या खासगी आयुष्यावर घाला घालणेच आहे. फेसबुकसोबतच सोशल नेटवर्किंग साईट आणि मोबाईल अॅप वापरणारे युजर्स आपल्या वैयक्तिक माहितीला दिल्याने काळजीत आहेत. झुकेरबर्ग यांनी प्रकरणानंतर आपल्या युजर्सची माफीही मागितली होती.