आजपासून टिवटिवाट वाढला, ट्विटर यूझर्स सुखावले

सामना ऑनलाईन । मुंबई

ट्विटर यूझर्ससाठी एक खूशखबर आहे. मायक्रो ब्लॉगिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या ट्विटरची शब्दमर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. १४० शब्दांची मर्यादा आता २८० पर्यंत वाढविण्यात आली आहे.

१४० या शब्दमर्यादेमुळे ट्विटर यूझर्स आपले ट्विट पूर्ण करू शकत नव्हते. सप्टेंबर महिन्यात १४० शब्दांपेक्षा अधिक शब्द वापरुन ट्विट करण्याची टेस्ट घेतली गेली होती, ज्यामुळे यूझर्स अधिक शब्दांत आपले मत मांडू शकत होते. ट्विटरच्या शब्दांची मर्यादा वाढवण्याची ही टेस्ट यशस्वी झाल्यानंतर आता २८० शब्दांत ट्विट करू शकणार असल्याचे ट्विटरने सांगितले आहे.

या वाढवलेल्या शब्दमर्यादेमुळे लोकांना अधिक ट्विट करण्यासाठी मदत होणार आहे. शब्दमर्यादेसोबतच अजूनही काही बदल करण्यात आले आहेत. आधी ट्विट करताना शब्दांची मर्यादा समजत होती. मात्र आता तशी मर्यादा दिसणार नाही. त्याऐवजी तुमच्या उजव्या हाताला ट्विटच्या पर्यायाच्या वर आता एक वतुर्ळ दिसते. जसे तुम्ही अक्षर लिहालं तसतसे ते वर्तुळ निळ्या रंगात पूर्ण होत जाईल. २८० शब्द पूर्ण होतील तसे वर्तुळ पूर्ण होईल.

तसेच अवघी २० अक्षरं राहिल्यानंतर निळे वर्तुळ केशरी रंगात होईल आणि संख्याही दर्शवले जातील आणि शब्द मर्यादा संपल्यानंतर वर्तुळ जांभळा रंग तसेच ऋण संख्या दर्शवेल.