ट्विटरसोबत ‘गोलमाल’ अन ट्विटरचे त्यांच्यासोबत ‘गोलमाल अगेन’

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर प्रत्येक सेकंदाला हजारो ट्वीट पडत असतात. युजरला आपले म्हणणे मांडण्यासाठी ट्विटरवर १४० अक्षरांची मर्यादा आहे. ही मर्यादा वाढवून २८० करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र ट्विटरकडून ही सुविधी मिळण्याची वाट न पाहता दोन युजर्सने ट्विटरसोबत गोलमाल केला आणि आश्चर्यकारकरित्या ३५ हजार अक्षरांचे ट्वीट केले. एका निबंधासारख दिसणारे हे ट्वीट काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते, मात्र नंतर ते ट्विटरने हटवले होते.

या ट्वीटची पहिली ओळ अशी होती की, ‘मित्रांनो @Timrasset आणि @HackneyYT अक्षरांची मर्यादा तुम्ही ओलांडू शकता. विश्वास बसत नाही ना? तर पुराव्यासाठी हे पाहा ३५ हजार अक्षरांचे ट्वीट.’ त्यानंतर सर्व अक्षरे लिहिण्यात आली होती. या ट्वीटनंतर ट्विटरकडून युजरचे अकाउंट बंद करण्यात आले होते. मात्र या ट्वीटची कॉपी वेबसाईटवरील अर्काइव्हमध्ये दिसू लागल्यानंतर ट्विटरकडून अकाउंटवरी बंदी मागे घेण्यात आली आहे.

हे सर्व कसे घडले?

३५ हजार अक्षरांचे ट्वीट कसे करण्यात आले होते याची माहिती ट्वीट करणाऱ्याने दिलेली नाही. मात्र एका अन्य युजरने हे सर्व कसे घडले याची माहिती दिली आहे. यात त्याने सांगितले आहे की, ट्वीटरची मेन बॉडी ही एक युआरएल (URL) आहे. ट्विटर युआरएलला (URL) एक अक्षर मानते. त्यामुळे तुम्ही देखील www. आणि त्यामध्ये स्पेस न देता तुम्हाला हवे तेवढे शब्द लिहाल व शेवटी .com किंवा .cc सारखे एक्सटेंशन लावाल तर असा चमत्कार तुमच्यासोबतही होईल. मात्र लक्षात ठेवा तुम्ही असे केल्यानंतर तुमचे अकाउंट ट्विटरकडून बंद होऊ शकते.