पानसरे हत्येप्रकरणी दोघे ताब्यात; कोल्हापूर ‘एसआयटी’ची कारवाई

1

सामना ऑनलाईन।  कोल्हापूर

भाकप नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापूर ‘एसआयटी’ने वासुदेव भगवान सूर्यवंशी (29) आणि भरत जयवंत कुरणे (37) या दोघांना ताब्यात घेतले आहे. पानसरे यांच्या हत्येत सहभाग, तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूल आणि मोटारसायकलची विल्हेवाट या दोघांनी लावल्याच्या संशयावरून अटकेची कारवाई केली आहे. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने या दोघा संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सूर्यवंशी याला मुंबई न्यायालयाकडून तर कुरणे याला बंगळुरूच्या सत्र न्यायालयाच्या आदेशातून कोल्हापूर पोलिसांकडून शुक्रवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. कुरणे हा ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातही संशयित आहे. जिल्हा न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधीश एस. ए. माळी यांच्यासमोर हजर केले असता सरकारी वकील ऍड. शिवाजी राणे आणि संशयित आरोपींचे वकील ऍड. समीर पटवर्धन यांनी युक्तिवाद केला.

यापूर्वी पाच संशयितांना ताब्यात घेतले होते

पानसरे हत्या प्रकरणात यापूर्वी एसआयटीकडून सनातन संस्थेचा सांगली येथील साधक समीर गायकवाड याला अटक करण्यात आली होती. समीर सध्या जामिनावर बाहेर आहे तर अनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य संशयित असलेले सनातन संस्थेचेच डॉ. वीरेंद्र तावडे यांनाही कॉ. पानसरे हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या डॉ. तावडे येरवडा कारागृहात आहेत. याच प्रकरणातील सारंग अकोळकर आणि विनय पवार हे अद्यापही फरार आहेत. शिवाय गेल्या दोन आठवडय़ांपूर्वीच पाचवा संशयित आरोपी अमोल काळे याला कर्नाटक पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर काळे याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर पुन्हा बंगळुरू कारागृहात पाठविले.