भंडारा जिल्ह्यात घट विसर्जनादरम्यान दोन मुलांचा बूडून मृत्यू

1

सामना ऑनलाईन । भंडारा

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सिंगोरी येथील मामा तलावात गणपती समोरील घट विसर्जनासाठी गेलेल्या २ मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. मृतामध्ये वैभव संभा आडे (१४) व संकेत कविंद्रकुमार कन्नाके (१५) यांचा समावेश आहे. मुलांच्या मृत्यूमुळे गावात शोकमय वातावरण आहे. विशेष म्हणजे या गावात यापुर्वी गणपती विसर्जनावेळी एका युवकाचा मृत्यू झाला तेव्हापासून गावात गणपतीची स्थापना केली जात नव्हती. आता पुन्हा या घटनेने शोककळा पसरली आहे.

सिंगोरी येथील ताराचंद कंगालेंच्या घरी गणपतीपुढे ठेवलेला घट विसर्जनाकरीता आज  सकाळी ११  वाजण्याच्या सुमारास कंगाले परिवार व गावातील काही मुले गावाशेजारील मामा तलावात गेले होते. घट विसर्जन झाल्यानंतर सर्वजण घराकडे यायला निघाले, मात्र वैभव आणि संकेत हे दोघे कुणालाही न सांगता तलावात पोहण्यासाठी गेले. त्यांना पोहता येत नसल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. गावात परतल्यावर लोकांच्या लक्षात आले, की संकेत आणि वैभव आपल्या सोबत नाहीत. त्यामुळे परत तलावाच्या आजूबाजूला त्या दोघांचा शोध घेतला असता, तलावाशेजारी त्या दोघांचे कपडे आढळून आले. त्यावरुन ते दोघे तलावात बुडल्याची शंका गावकर्‍यांना येताच घटनेची माहिती पवनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्या दोघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.

मृत वैभव ८ वीत शिकत होता तर संकेतचे यंदाचे १० वीचे वर्ष होते. दोघेही पवनी येथील विकास हायस्कूल मध्ये शिकत असल्याने दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री होती. या दोघांच्या  मृत्यूमुळे दोन्ही परिवाराने आपल्या एकुलत्या एक मुलांना कायमचे गमावले आहे.