गोदावरी नदीत दोन मुले वाहून गेली


सामना ऑनलाईन , वैजापूर

तालुक्यातील बाबतारा येथील दोन शाळकरी मुले गोदावरी नदीत वाहून गेल्याची घटना आज सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. या मुलांना शोधण्याचे काम पोलीस, अग्निशमन दल व महसूल विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत या दोन्ही मुलांचा शोध प्रशासनाला लागला नाही.

तुषार सतीश गांगड (१४) व विवेक कालीचरण कुमावत (१५, रा. बाबतारा) असे नदीत वाहून गेलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. तुषार हा आठवीत तर विवेक हा नववीत गावातीलच शाळेत शिकतो. सध्या पाऊस सुरू असल्याने गावालगत असलेल्या गोदावरी नदीला पूर आलेला आहे. त्यामुळे दोघेही आज सकाळच्या सुमारास नदीत अंघोळ करण्यासाठी गेले होते.

नदीत अंघोळ करून ते श्रावणी सोमवारनिमित्त महादेवाला पाणी आणणार होते. नदीत उतरल्यानंतर या दोघांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याच्या प्रवाहासोबत ते दोघेही वाहत गेले. यावेळी त्याच परिसरात दुसरी शाळकरी मुले अंघोळ करीत होती. नदीत कोणीतरी बुडत असल्याचा आवाज त्या मुलांना आला, त्यांनी पाहिले असता तुषार व विवेक पाण्यात वाहून जात असल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड करून गावातील नागरिकांना ही माहिती दिली.

प्रथम गावातील नागरिकांनी नदीत उड्या घेऊन शोध घेतला. मात्र, पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे शोध मोहीम अयशस्वी ठरली. अखेर गावातील नागरिकांनी ही माहिती विरगाव पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाला पाचारण करून शोधमोहीम सुरू केली. दोन बोटींच्या साह्याने या मुलांचा दिवसभर शोध घेण्यात आला. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी डॉ संदिपान सानप, नायब तहसीलदार रमेश भालेराव व विरगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, तालुकाप्रमुख प्रा. रमेश बोरनारे, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, दत्ता धुमाळ, रमेश सावंत, प्रभाकर गाडेकर आदींसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.