गणपतीचे मखर बघून परतणाऱ्या तरुणांचा अपघाती मृत्यू

सामना प्रतिनिधी । मुंबई

गणपतीच्या सजावटीसाठी मखर बघून परतणाऱया दोघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. चेतन कोकणे आणि सुशांत सावंत अशी या दोघांची नावे आहेत. गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या अपघातामुळे मुलुंडच्या कोकणे आणि सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चेतन कोकणे हा मुलुंडच्या म्हाडा वसाहतीत आई, पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलासह राहत होता. चेतनच्या सासूवर टाटा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी तो तिला भेटण्यासाठी आला होता. सासूला भेटल्यानंतर सुशांत सावंत या मित्रासह विक्रोळीत राहणाऱया काकांकडे गेला. या ठिकाणी त्याने गणपतीसाठी मखराची ऑर्डर दिली होती. मखराचे काम बघून दोघेही रविवारी मध्यरात्री विक्रोळीहून मोटरसायकलवरून घरी जाण्यासाठी निघाले. टी जक्शनजवळ त्यांची मोटरसायकल दुभाजकाला धडकली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला.

चेतन हा शेअर मार्केटमध्ये नोकरी करत होता तर सुशांत व्हिडीओ एडीटर होता. चेतनला पाच वर्षांचा मुलगा आहे. चेतन आणि सुशांत दोघांच्या अपघाती मृत्यूने म्हाडा वसाहतीत हळहळ व्यक्त केली जात आहे.