‘आरे’तील विहिरीत दोघे बुडाले, एकजण नाल्यात वाहून गेला

सामना प्रतिनिधी । मुंबई

गोरेगाव येथील आरे कॉलनीत दुपारी विहिरीत बुडल्याने दोन तरुण मुलांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. प्रथमेश मालवणकर आणि शुभम शर्मा अशी या मुलांची नावे असून दोघेही 17 वर्षांचे आहेत. तर दुसऱया घटनेत विक्रोळी पार्कसाइट येथील नाल्यात दोन मुले वाहून गेली. त्यापैकी एकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून सोनू कुरेशी या 12 वर्षांच्या मुलाचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.

आरे कॉलनीतील वनितापाडा येथील विहिरीत पोहण्यासाठी काही तरुण मुले उतरली होती. तीन मुलांना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. तर बेशुद्धावस्थेत बाहेर काढण्यात आलेल्या अन्य दोन मुलांना उपचारासाठी सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तर दुसरी घटना विक्रोळी पार्कसाइट येथील आहे. अंबिकानगर येथील नाल्यात सायंकाळी 5 वाजता दोन मुले पडली. त्यापैकी एकाला वाचवण्यात आले.