अजब….अंबाजोगाईमध्ये जन्माला आले दोन तोंडांचे बाळ

सामना ऑनलाईन । बीड

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये एक अजब घटना घडली आहे.येथील एका महिलेने दोन तोंड असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूती विभागात परळी तालुक्यातील एक महिला बाळंतपणासाठी दाखल झाली होती. तिच्यावर उपचार करताना व तिची पूर्वीची कागदपत्रे तपासतांना तिच्या पोटातील बाळ असामान्य आहे हे लक्षात आल्यानंतर सर्व दक्षता घेत डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या महिलेला शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. महाविद्यालय आणि रुग्णालय विभागाच्या प्रसूती विभागात रविवारी २९ ऑक्टोबरला रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी महिलेने या बाळाला जन्म दिला आहे. प्रसूतीशास्त्र विभागातील प्रख्यात सर्जन डॉ. संजय बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अवघड शस्त्रक्रिया पूर्ण केली. बाळ-बाळंतीण सुखरूप असून बाळाच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यासाठी त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

dr-sanjay-bansode

या बाळाचे वजन ३ किलो ७०० ग्रॅम असून बाळ आणि बाळाच्या आईची प्रकृती सध्या चांगली असली तरी बाळाच्या संपूर्ण हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्यावर शिशू अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या असामान्य बाळाला दोन डोके, दोन किडणी आणि दोन फुफ्फुसे असले तरी इतर सर्व अवयव एक-एकच आहेत. या बाळाच्या आईला यापूर्वी तीन मुली आणि एक मुलगा असून हे पाचवे अपत्य आहे. याच वैद्यकीय महाविद्यालयात २०१४ साली एका महिलेने सातव्या महिन्यात अशाच एका असामान्य बाळाला जन्म दिला होता. मात्र ते बाळ लगेच दगावले होते. अशा असामान्य बाळाच्या आयुष्याबद्दल खात्रीपूर्वक काहीही सांगता येत नसले तरी अशी असामान्य बाळे अनेक वर्षे जगत असल्याचीही अनेक उदाहरणे वैद्यकीय शास्त्र अभ्यासात आढळून आले असल्याचेही डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.

डॉ. संजय बनसोडे हे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूती विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम पाहतात. त्यांनी अवघड शस्त्रक्रिया करत अनेक महिलांचे व बाळांचे प्राण वाचवले आहेत. डॉ.बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या कामाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. शैलैश वैद्य यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.