जम्मू कश्मीरमध्ये जैशच्या दोन कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा

सामना ऑनलाईन । जम्मू

जम्मू कश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर भागात जवान व दहशतवादी हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. घटनास्थळावरून जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

सोपोर भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिली होती. त्या माहितीच्या आधारे गुरुवारी रात्रीपासून या भागात शोधमोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेच्या वेळी दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.


‘खात्मा करण्यात आलेले दहशतवादी हे जैश ए मोहम्मद या संघटनेचे आहेत. या चकमकीत कोणत्याही प्रकारची वित्तहाणी झालेली नाही. तसेच एकही जवान जखमी झालेला नाही. या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. अद्याप या भागात शोध कारवाई सुरू झालेली आहे’, असे दक्षिण कश्मीरचे महासंचालक अतुल कुमार गोयल यांनी सांगितले.