पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान शहीद

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानचा गोळीबार सुरूच असून शनिवारी रात्री या गोळीबारात हिंदुस्थानचे दोन जवान शहिद झाले. पाकड्यांनी या सेक्टरमधील दहा चौक्यांवर रात्रभर गोळीबार केला. हिंदुस्थानी लष्कराने देखील गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र या चकमकील विजय कुमार पांडे आणि सत्यनारायण यादव हे दोन सीमा सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले.

जम्मू कश्मीरमधील विविध जिल्ह्यांमध्ये शनिवार दुपारपासूनच पाकड्यांच्या कुरघोड्या सुरू आहेत. शनिवारी रात्री अडीचनंतर अखनूर सेक्टरमधील हिंदुस्थानी चौक्या व त्याच्या आजुबाजुच्या जवळपास ३० गावांवर पाकिस्तानने तोफगोळांचा मारा करत गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान जखमी झाले. या जवानांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या हल्ल्यात तीन सामान्य नागरिकही जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.