मलेशियात अपहरण झालेल्या डोंबिवलीच्या दोन भावांची सुटका

सामना ऑनलाईन । ठाणे

मलेशियात व्यापारासाठी गेलेल्या आणि अपहरण झालेल्या डोंबिवलीतील दोघा भावांची सुखरूप सुटका करण्यात आली असून दोघेही सुखरुप घरी पोहोचले आहेत. डोंबिवलीतील रोहन वैद्य आणि कौस्तुभ वैद्य हे भाऊ व्यावसाईक कामासाठी मलेशियाला गेले असता त्यांचे ३ ऑगस्ट रोजी अपहरण झाले होते.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दोघांची सुखरुप सुटका झाल्याची माहिती ट्विटरवर माहिती देत, मलेशियातील हिंदुस्थानचे उच्चायुक्त मुदुल कुमार व त्यांच्या टीमचे आणि मलेशिया पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

रोहन वैद्य आणि कौस्तुभ वैद्य हे दोघे डोंबिवलीकर भाऊ मासे निर्यातीचा व्यावसाय करतात. ते मासे निर्यात करणाऱ्या रॉक फ्रॉजन फूड कंपनीच्या कामानिमित्त १ ऑगस्ट रोजी मलेशियात गेले होते. त्यांचे ३ ऑगस्टला क्वालालम्पूर येथून अपहरण झाले होते. अपहरणकर्त्यांनी वैद्य कुटुंबीयांकडे १ कोटी रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी वैद्य कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्रालय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाणे पोलीस यांच्याशी संपर्क साधला होता. अपहरणाची माहिती मिळताच परराष्ट्र मंत्रालयाने तेथील हिंदुस्थानच्या उच्चायुक्तांशी संपर्क साधून मलेशिया पोलिसांकडे त्यांची सुटका करण्याची विनंती केली होती.

मलेशिया पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोघांचाही शोध लावला. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय उच्चायुक्तालयातील व्यक्तीही मदतीला देण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे दोघा भावांची सुखरूप सुटका करण्यात आली असून अपहरणकर्त्यांना अटक करण्यात आल्याची
माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. रोहन आणि कौस्तुभ दोघेही घरी सुखरुप परतल्याने वैद्य आणि कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे.