चंद्रपूर शहरालगतच्या वन तलावात 2 मुलांचा बुडून मृत्यू

1

सामना प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर शहरालगतच्या लोहारा गावाशेजारी असलेल्या वन तलावात 2 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी उजेडात आली आहे. कालपासून लोहारा गावातील हे दोन शालेय विद्यार्थी बेपत्ता होते. दोघांचाही काल रात्रीपासून ग्रामस्थांकडून शोध घेतला जात होता. रात्री उशिरा पोलिसांना या घटनेची माहिती देऊनही पोलिसांनी याबाबत निष्काळजीपणा दाखविल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

दरम्यान, आज सकाळी परत जंगलात शोध मोहीम राबविली गेली. यावेळी तलावातील पाण्यात दोघांचे मृतदेह तरंगताना आढळले आणि मग पालकांनी एकच हंबरडा फोडला. अंशु घनश्याम कोडापे आणि रितीक प्रकाश मेश्राम अशी मृत मुलांची नावे आहेत. या वन तलावाशेजारी खूप मोठ्या संख्येत वन्यजीव पाणी पिण्यासाठी येत असतात. त्यामुळे तलावात ग्रामस्थ आंघोळीसाठी क्वचित जातात. त्यातच ही मुले इथे कशी पोचली आणि तलावात कशी गेली, याबाबत तर्क लढविले जात आहेत. दरम्यान रामनगर पोलिसांचे पथक नेहमीप्रमाणे उशिरानेच घटनास्थळी पोचत या घटनेबाबत अधिक तपास सुरू केला आहे.