विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी, धुळे

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील चितोड रोडलगत असलेल्या रंगारी चाळीतील मायाक्का देवी मंदिराची रंगरंगोटी करतांना वीज वाहिनीचा धक्का लागून दोन तरुणांचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. वीज वितरण कंपनीवर रोष व्यक्त करीत मृत तरुणांच्या नातेवाईकांनी आणि रंगारी चाळीतील नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन केले. अखेरीस आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न होतील, असे आश्वासन पोलीस उपअधीक्षक हिंमत जाधव यांनी दिल्यानंतर जमावाचा रोष कमी झाला.

घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. शहर आणि जिल्हय़ात गेल्या काही वर्षापासून नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजता होतो. त्यासाठी सार्वजनिक मंडळे तयारी करतात. चितोड रोडवरील रंगारी चाळीतील मायाक्का मंदिराची सजावट नवरात्रोत्सवासाठी करण्यास सुरुवात झाली. नागरिकांनी मंदिराची डागडुजी करून रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या परिसरातील अजय ऊर्फ बादल नामदेव मोरे आणि गोरख पांडुरंग बोरसे या तरुणांनी मंदिराचे रंगकाम हाती घेतले. मंदिराच्या कळसाकडे रंग देण्याचा प्रयत्न या तरुणांकडून होत होता. त्याच वेळी कळसाजवळून वीज कंपनीच्या उच्चदाब वाहिनीच्या तारांना या तरुणांचा धक्का लागला. काही वेळेतच उच्चदाबाची वीज या तरुणांच्या शरीरात प्रवाही झाली आणि दोघांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मंदिराजवळ एकवटले. वीज कंपनीवर रोष व्यक्त करीत जमाव थेट शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि दोनही तरुणांच्या कुटुंबियांना मोठी आर्थिक मदत देण्यास भाग पाडावे. मदत दिली जात नाही तोवर आम्ही पोलीस ठाण्याच्या आवारातून बाहेर पडणार नाही अशी भूमिकाच जमावाने घेतली. सुमारे तासभर चर्चा करीत पोलीस उपअधीक्षक हिम्मत जाधव यांनी वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता पावरा यांना पोलीस ठाण्यात बोलवून चर्चा घडविली. त्यावेळी कंपनीकडून मृत तरुणांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत केली जाईल असे स्पष्टीकरण कार्यकारी अभियंता पावरा यांनी दिले. त्यानंतर नागरिकांचा रोष कमी झाला आणि पोलीस ठाण्यातील जमाव माघारी गेला.