दोन दिवसांत दोन लाख भाविकांनी घेतले साईबाबांचे दर्शन

सामना ऑनलाईन । शिर्डी

नाताळला लागून आलेल्या सलग सुट्टय़ांमुळे साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात आले होते. त्यामुळे शनिवार-रविवारी या दोन दिवसांत सुमारे दोन लाख भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. दरम्यान, संस्थानचे सर्व आश्रम फुल्ल झाल्यामुळे आणि हॉटेलमालकांनी दर वाढविल्यामुळे कित्येक भाविकांना मंडपात रात्र काढावी लागली.

– दि. २४ आणि २५ या दोन दिवसांत सुमारे दोन लाख भाविकांनी बुंदी लाडू प्रसादाचा तर १ लाख ४० हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला.

– नवीन वर्षाच्या स्वागताच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी समाधी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात येणार आहे.

– या दिवशी रात्रीची शेजारती आणि १ जानेवारी रोजी पहाटे होणारी काकडआरती होणार नाही. तसेच साईसत्यक्रत पूजा, अभिषेक पूजा व वाहनांची पूजा बंद राहील, असे सीईओ श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.

दर्शन बारीत साईभक्ताचा मृत्यू

साईदर्शनासाठी अपंगांच्या रांगेत थांबलेल्या साईभक्ताचा सोमवारी दुपारी दर्शन बारीत मृत्यू झाल्याची घटना घडली. थल्लूरी केशवराव भद्रय्या (५५, रा. खम्माम, तेलंगणा) असे मृत्यू झालेल्या भाविकाचे नाव आहे. सोमवारी दुपारी ते कुटुंबासह मंदिरात आले होते. टाइम दर्शन पास काढून अपंगांच्या बारीत येत असतानाच त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. तसेच अधूनमधून झटकेही येत होते असे त्यांचा मुलगा भरतकुमार व नातू राजू यांनी सांगितले. दरम्यान, के. एम. प्रकाश (रा. दावणगिरी, कर्नाटक) या भाविकाचा रविवारी सकाळी साईआश्रम या धर्मशाळेत मृत्यू झाला होता.