दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

सामना प्रतिनिधी । नागपूर

गडचिरोली जिल्ह्यातील विविध दलममध्ये कार्यरत २ जहाल महिला नक्षल्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. जया उर्फ शांती मासू मट्टामी व रनिता उर्फ सुनीता नामदेव कोडापे अशी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांची नावे आहेत. त्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.

जया उर्फ शांती मासू मट्टामी (२४) ही डिसेंबर २०१२ पर्यंत भामरागड दलममध्ये सदस्य म्हणून कार्यरत होती. त्यानंतर मे २०१३ मध्ये तिची बदली प्लाटून क्रमांक १४ मध्ये करण्यात आली. ६ डिसेंबर २०१७ रोजी पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक झाल्यानंतर वरिष्ठ नक्षल्यांच्या उपस्थितीत तोंडेर जंगलात बैठक घेण्यात आली. यात जयाची नियुक्ती प्लाटून क्रमांक १४ च्या उपकमांडरपदी करण्याची घोषणा करण्यात आली. जयावर खुनाचे ११ गुन्हे, जाळपोळीचे ६, नैनेर येथील चकमक (२०१४), बेजूरपल्ली चकमक (२०१३), नैनगुडा फाट्यावरील चकमक (२०१४) व दोडगीर चकमक (२०१४) अशा १२ चकमकींसह २९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर ४ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

रनिता उर्फ सुनीता नामदेव कोडापे (१८) ही डिसेंबर २०१३ मध्ये अहेरी दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. फेब्रुवारी २०१६ पासून तिची बदली सिरोंचा दलममध्ये करण्यात आली. तिच्यावर खुनाचे ८ गुन्हे, जाळपोळीचे ४, तसेच गुरजा जंगलातील चकमक (२०१४), नैनगुडा चकमक (२०१४), कल्लेड चकमक (२०१७) अशा ११ पोलिस चकमकींसह २३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर २ लाखांचे बक्षीस ठेवले होते.

आज या दोघींनीही नक्षलविरोधी अभियानाचे अपर पोलिस महासंचालक डी.कनकरत्नम, विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार, पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. मागील वर्षात २२ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले असून, चालू वर्षांत आतापर्यंत २ महिला नक्षलींनी आत्मसमर्पणाचा मार्ग पत्करला. आत्मसमर्पित नक्षल्यांपासून प्रेरणा घेऊन दलममधील इतर सदस्यही नक्कीच आत्मसमर्पण करतील, असा विश्वास पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

१३ वर्षांची असताना रनिताला नेले होते नक्षल्यांनी
रनिता कोडापे ही अवघ्या १३ वर्षांची असताना नक्षल्यांनी तिला तिच्या घरातून नेले होते. नक्षलवादी संविधान व लोकशाहीविरुद्ध काम करुन निष्पाप आदिवासींचे मुलभूत हक्क हिरावून घेतात. त्यांचा वापर करुन त्यांच्या हक्काची लढाई आपण लढत आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु हा त्यांचा दुटप्पीपणा आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.