विहिरीत पडलेल्या निलगायीना वाचवण्यात वन विभागाला यश

39

सामना प्रतिनिधी । आष्टी

आष्टीतील धामणगावमध्ये चार तासाच्या अथक परिश्रमानंतर विहिरीत पडलेल्या दोन निलगायींना सुखरूप बाहेर काढण्यात येथील वनविभाग व प्राणीमित्रांना यश आले. धामणगावातील शेतकरी सर्जेराव सुरवसे यांच्या शेतातील विहिरीमध्ये दोन नीलगाय पडल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानंतर तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या बचाव पथकास बोलावून गावकऱ्यांच्या मदतीने दोरखंडाच्या सहायाने अथक परिश्रमानंतर त्या दोन्ही निलगायींना विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.

विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते व वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना जंगलात सोडण्यात आले. विहिरीतून निलगायींना बाहेर काढण्यासाठी वनपाल एस. पी. धसे, वनरक्षक अनिल जगताप, बी.ए. शिंदे,सर्पराज्ञीचे संचालक वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे, डॉ. लहू थोरात, दीपक थोरात,विनोद शिरोळे, लतीफ सय्यद,शेख युनूस,बनशीतांदळे,बाबन गुंजाळ, मोहिते पवार,नामदेव दहिफळे, कानिफ पवार,जयसिंग गोरख व यांच्यासह गावकऱ्यांनी सहकार्य केले.

सकाळी सात वाजता वनविभागाला माहिती मिळाली. सकाळी आठ वाजेपासून बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला इंजिनाच्या सहाय्याने विहिरीतून पाणी उपसून काढण्यात आले. ९ वाजता विहिरीत उतरून दोरखंडाने निलगाईंना बांधण्यात आले. त्यानंतर निलगायींना विहिरीतून बाहेर काढण्यास आले. पहिली नीलगाय अकरा वाजता तर दुसरी नीलगाय बारा वाजता सुखरुप विहिरीबाहेर काढण्यात यश आले.

आपली प्रतिक्रिया द्या