आमदारपुत्र रॉकीसोबत दोनजणांना जन्मठेप

सामना ऑनलाईन । गया

आपल्या गाडीला ‘ओव्हरटेक’ केले म्हणून बारावीच्या विद्यार्थ्याची सरळ गोळी झाडून हत्या केल्याच्या प्रकरणातील दोषी रॉकी यादवसोबत दोनजणांना जिल्हा न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रॉकी यादव हा संयुक्त जनता दलाच्या निलंबित आमदार मनोरमा देवी यांचा मुलगा आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात रॉकी यादव याने त्याच्या गाडीला ओव्हरटेक केल्यावरून बारावीचा विद्यार्थी आदित्य सचदेव याच्याशी भांडण केले होते. त्या भांडणात रॉकी यादव याने गोळ्य़ा झाडून आदित्यची हत्या केली होती. आदित्य सचदेव याच्या गाडीत त्याचा मित्र आयुष हा बसलेला होता. ‘आम्ही यादव यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला हे खरे, पण त्याचवेळी आमच्या दिशेने गोळीबार सुरू झाला. गोळीबार करणाऱ्यांमध्ये एकजण ‘कमांडो’च्या वेशात होता. त्यांनी केलेल्या गोळीबारात माझा मित्र आदित्य मारला गेला, असा जबाब आयुषने दिला होता.

रॉकी यादव याचा बाप बिंदी यादव यालाही जिल्हा न्यायालयाने पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. आपला मुलगा रॉकी याला वाचविण्यासाठी आटापिटा केल्याबद्दल बिंदी यादव याला न्यायमूर्ती सच्चिदानंद प्रसाद सिंह यांनी दोषी ठरवले. या प्रकरणात रॉकी यादवचा चुलत भाऊ टेनी यादव, आमदार आईचा बॉडीगार्ड राकेश कुमार यांनाही जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.