दोन शाळकरी मुलींचे अपहरण करून बलात्कार

8
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, भिवंडी

फेणापाडा येथील दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना काही तरुणांनी फूस लावून पळवून त्यांच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. भिवंडी पोलिसांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे सापळा लावून दोघा अत्याचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. त्या पीडित मुलींची सुखरूप सुटका केली असून अजय कसबे (15) व झिनुआ बिंद (18) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन मुलींशी प्रेमसंबंध जोडून त्यांना 16 एप्रिल रोजी फूस लावून कल्याणमार्गे नाशिक येथे पळवून नेले होते. या दरम्यान त्या दोघांनी पीडित मुलींवर बलात्कार केला. एवढेच नव्हे तर त्यांना बिहार राज्यात पळवून नेण्याचीही तयारी केली होती. या घटनेची शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक हनीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रेल्वे स्थानकात बुधवारी रात्री सापळा लावण्यात आला होता.

पोलीस कोठडी
‘त्या’ मुलींना सोबत घेऊन दोघेही तरुण बिहारकडे जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत उभे असल्याचे पोलीस पथकाच्या निदर्शनास आले असता त्यांच्यावर झडप टाकून दोघांनाही शिताफीने अटक केली. या दोघांपैकी झिनुआ याला आज भिवंडी न्यायालयात तर अजय कसबे यास बाल न्यायालयात हजर केले. बिंद यास 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी तर कसबे याला 21 एप्रिलपर्यंत बालगृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.