रवी पुजारी गँगचे शार्पशूटर गजाआड

फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन, मुंबई

हत्या, दुहेरी हत्याकांड, गोळीबार यांसारख्या गुह्यांतील आरोपी आणि रवी पुजारी गँगचे शार्पशूटर असलेल्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-9 ने गजाआड केले आहे. सांताप्रुझ परिसरात गुन्हा करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी दोघांना उचलले. त्यांच्याकडून चार पिस्टल आणि 29 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.

रवी पुजारीचे शूटर आणि अनेक गंभीर गुह्यांतील दोन आरोपी सांताप्रुझ परिसरात काही तरी गुन्हा करण्याच्या तयारीत येणार असल्याची खबर युनिट-9 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाली. त्यानुसार देसाई व त्यांच्या पथकाने सांताप्रुझ परिसरात सापळा रचून सादिक इब्राहिम बंगाली ऊर्फ सलमान (40) आणि धवल चंद्रप्पा देवरमनी (26) या दोघांना रंगेहाथ पकडले. दोघांच्या अंगझडतीत पिस्टल आणि काडतुसे मिळाली. या दोघांवर अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुह्यांची नोंद आहे. 2006 मध्ये बॉलीवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर गोळीबार, 2008 मधील देवीदास चौगुले हत्या प्रकरण आणि 2015 मधील लोणावळय़ातील दुहेरी हत्या प्रकरणात सादिकचा सहभाग होता. सादिक आणि धवलला वेळीच अटक केल्यामुळे पुढील अनर्थ टळला, असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, रवी पुजारीसाठी काम करणाऱ्या सादिकने पुजारीपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला होता. सादिक आता स्वतःची टोळी बनविण्याच्या प्रयत्नात होता. यासाठी गुंडांची जमवाजमव तो करीत होता, पण वेळीच महेश देसाई व त्यांच्या पथकाने सादिकला दणका दिला.