दोन गवे विहिरीत पडले

सामना प्रतिनिधी, दोडामार्ग

सावंतवाडी येथील बाहेरचावाडा परिसरातील गोविंदचित्र मंदिरच्या मागील बाजूस दोन गवे विहिरीत पडले. हा प्रकार आज सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला. यातील एका गव्याचा मृत्यू झाला तर दुसऱ्याला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

विहिरीला कठडा नसल्याने रात्री उशिरा दोन गवे विहीरीत कोसळले होते. सकाळी तेथील कामगाराच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी याची माहिती नागरिकांना दिली. त्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी धावपळ उडाली त्यातील एका गव्याचा मृत्यू झाला आहे तर दुसरा पाण्यात पोहत होता. त्याला वाचविण्यासाठी नागरिक आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले. तब्बल अडीच तासाच्या प्रयत्नानंतर गव्याला बाहेर काढण्यात यश आले. त्याला वनविभागाने ताब्यात घेवून नैसर्गिक अधिवासात सोडले. मृत गव्यावर परिसरातच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, वनविभागाचे अधिकारी सुभाष पुराणिक, वनक्षेत्रपाल विजय कदम, संतोष मोरे आदींनी त्या ठिकाणी धाव घेत गव्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला.