जाळायचं का पुरायचं? नवऱ्याच्या मृत्युनंतर सवतींमध्ये राडा

सामना ऑनलाईन । चेन्नई

जगण्यातल्या असंख्य अडचणी, कटकटी, चिंता यांपासून आपल्याला मरणानंतर सुटका मिळते, असं म्हणतात. पण, काहींना मरणानंतरही शांतता मिळत नाही. दोन बायका करणाऱ्या एका माणसाच्या बाबतीतही हेच झालं आहे. त्याच्या मृत्युनंतर अंत्यसंस्कार नेमके कोणत्या धर्मानुसार व्हावेत, या मुद्द्यावरून त्याच्या दोन बायकांमध्ये रणकंदन माजलं आहे. हा वाद आता मद्रास उच्च न्यायालयात पोहोचला असून दोन्ही बायकांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार नाही.

दक्षिणमूर्ती नावाच्या या माणसाने दोन विवाह केले होते. पहिला विवाह त्याने थंगामल नावाच्या हिंदू महिलेशी तर दुसरा गौरी अलियास येसूमेरी नावाच्या ख्रिश्चन महिलेशी केला. १६ ऑगस्ट रोजी दक्षिणमूर्ती यांचं निधन झालं. त्यावेळी ते त्यांच्या दुसऱ्या बायकोसोबत राहत होते. निधनानंतर गौरीने त्यांच्यावर रोमन कॅथलिक पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावेत अशी त्यांची इच्छा असल्याचं मृत्युपत्राच्या हवाल्याने सांगितलं. हे मृत्युपत्र बनावट असल्याचं सांगत थंगामलने हिंदू धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली.

दोघीही इरेला पेटल्यामुळे स्थानिक पोलिसांनी दोघींमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तीन तास मध्यस्थी करूनही काहीच फरक पडत नाही असं पाहून त्यांनी दक्षिणमूर्ती यांच्या मृतदेहाला शवागारात हलवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या दोघींचा वाद थेट उच्च न्यायालयात पोहोचला. तिथे न्यायमूर्ती पी. एन. प्रकाश यांनी दोघींनाही समेटासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतरही जर हा वाद मिटला नाही, तर पोलिसांकरवी दक्षिणमूर्ती यांच्या मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करण्यात येतील, असा निर्णय दिला आहे.

summary- two wives fight over husbands funeral