भेंडीबाजारातील भीषण आगीत दोन महिलांचा होरपळून मृत्यू

8

सामना ऑनलाईन । मुंबई

भेंडीबाजारमधील बोहरी मोहल्ल्यातील पंजाब महल या पाच मजली इमारतीत शुक्रवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला. यात 11 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आग दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या चार जवानांनाही धुराचा त्रास झाला.

भेंडीबाजारातील दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींमधील पाच मजली इमारतीत चौथ्या व पाचव्या मजल्यावर रात्री 10.45 च्या सुमारास आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाने 11.23 च्या सुमारास श्रेणी-3 ची आग जाहीर केली. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू होते. या ठिकाणी अरुंद रस्ता, दाटीवाटी वस्ती यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडचणी आल्या. अखेर पहाटे तीनच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीत फरिदा मास्टर (60) आणि नफिसा गीतम (60) या दोन महिलांचा मृत्यू झाला, तर 11 जण जखमी झाले. यात चार अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश असून त्यांना धुराचा त्रास झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

जखमींची नावे
चंद्रशेखर गुप्ता ( 36), पुंडलीक मांडे ( 27), रमेश सरगर (35) गोपाळ विठ्ठल पाटील (चौघेही अग्निशमन दलाचे जवान), ताहिर नळवाला ( 72), मुस्तफा सोनी (42), फरिदा छित्तरवाला (52), सैफुद्दीन छित्तरवाला (62), बुहराद्दीन होटलवाला (29) मुस्तफा हॉटेलवाला (46) आणि अली असगर ( 32) या रहिवाशांना धुराचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या