आत्महत्येपासून परावृत्त करण्यास गेला, दोन्ही सख्ख्या भावांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

घरगुती कारणावरून मोठ्या भावासोबत वाद झाला. वादानंतर राग आलेल्या मोठा भाऊ रेल्वेसमोर आत्महत्या करण्यासाठी पळत सुटला. भावाला वाचवण्यासाठी लहानाही आरडाओरड करीत त्याचा पाठलाग केला. पटरीजवळ पोहचताच त्याने मोठ्या भावाला ढकलले. मात्र, तितक्यात दोघे रेल्वेसमोर चिरडले गेले. ही हृद्रयद्रावक घटना रविवारी रात्री मुकुंदवाडी, राजनगर रेल्वेपटरीजवळ घडली.

मुकुंदवाडी भागातील मुकुंदनगर येथे मिलिंद बागूल यांचे कुटुंब राहते. मिलिंद यांना मोठा जयेश (25) आणि छोटा मुलगा आकाश (20) अशी दोन मुले आहेत, तर त्यांच्या एका मुलीचे लग्न झालेले आहे. मुलगी सध्या माहेरी राहते. रविवारी रात्री घरगुती कारणावरून दोघा भावांत किरकोळ वाद सुरू झाला. वाद टोकाला गेल्यामुळे जयेश रागाच्या भरात आत्महत्या करण्यासाठी थेट रेल्वेपटरीजवळ धावत गेला. योगायोगाने जालन्याचा दिशेने जाणारी रेल्वे निघतच होती. मोठा भाऊ आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे पाहून घरातील मंडळींनी त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. पाठोपाठ लहान भाऊ आकाश हाही आरडाओरड करीत मोठ्या भावाच्या मागे धावत त्यास रेल्वे रूळावरून ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियतीने दोघांवरही सूड उगवला व दोघे भाऊ रेल्वेखाली चिरडले गेले. रेल्वेखाली येऊन जयेशच्या शरीराचे तुकडे झाले तर आकाशही जागीच चिरडला गेला. हि हृद्रयद्रावक घटना घडताच नागरिकांनी तात्काळ घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. मुकुंदवाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. रात्री 11 च्या सुमारास दोघांनाही घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. जयेशयाचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून तो प्लंबरचे काम करीत होता. तर आकाश रिक्षाचालक आहे.

मिलिंद बागूल यांच्या दोन्ही मुलांचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाल्याने बागूल कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोघा भावांतील भांडणाचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार एस. एन. गवारे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.