सेन्सॉर बोर्डाकडून दिलेल्या प्रमाणपत्रांचे अर्थ जाणून घ्या


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सध्या पद्मावती या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यावरून नवीन चर्चा सुरू झाली आहे. सेन्सॉर बोर्डाने पद्मावतीला हिरवा कंदील दाखवला असून यू ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की ही प्रमाणपत्र नेमकी कशी दिली जातात. या प्रमाणपत्रांवर असलेली अक्षरं चित्रपटाची पठडी सांगतात आणि तो कोणत्या पठडीतल्या प्रेक्षकांसाठी आहे हेही स्पष्ट करतात.

अशी होते विभागणी-
१. यू (U)- या विभागातील चित्रपट हे कौटुंबिक पठडीतले असतात. लहानांपासून ते थेट मोठ्यांपर्यंत सगळे हा चित्रपट पाहू शकतात. त्यामुळे चित्रपटाचा हा विभाग वैश्विक विभाग म्हणून ओळखला जातो.

२. यू/ए (U/A)– या विभागातील चित्रपट हे १२ वर्षांखालील मुलांसाठी नसतात. त्यांना हे चित्रपट पाहायचे असतील तर आपल्या पालकांच्या देखरेखीखाली पाहावे लागतील, असा या चिन्हाचा अर्थ असतो. सौम्य पातळीवरील हिंसा, असभ्य शब्दांचा वापर अथवा सौम्य पातळीवरील लैंगिकता समाविष्ट असलेले चित्रपट या विभागात येतात.

३. ए (A)– या विभागातील चित्रपट हे फक्त प्रौढांसाठीच असतात. जे विषय लहान मुलांसमोर येणं इष्ट नसतं अशा विषयांवर बनलेले, हिंसा, लैंगिकता, अश्लील भाषा यांचा वापर असलेले चित्रपट या पठडीत येतात. अर्थात हिंसा, लैंगिकता किंवा भाषा यांचं प्रमाण किती असावं किंवा चित्रीकरण कसं केलं गेलं आहे, याचे वेगळे नियम आहेत, जे चित्रपट निर्मितीवेळी निर्मात्यांना पाळावे लागतात.

४. एस (S)– या विभागातील चित्रपट हे सामान्य जनतेसाठी उपलब्ध नसतात. हे चित्रपट काही विशिष्ट व्यवसायांशी निगडीत लोकांसाठीच असतात. उदा. डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनिअर इत्यादी.

याखेरीज व्ही/यू (V/U), व्ही/यूए, व्ही/ए हीसुद्धा काही प्रमाणपत्र सेन्सॉर बोर्डातर्फे जारी केली जातात.