आखाती देशात होते मजुरांचे शोषण

सामना ऑनलाईन। दुबई
आखाती देशात नोकरीसाठी गेलेल्या दक्षिण आशियाई मजुरांचे तेथील कंपन्यांकडून शोषण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मजुरांना तेथील कंपन्या कमी पैशात राबवून घेण्याबरोबरच त्यांच्याकडूनच काम दिल्याची अव्वाच्या सव्वा फी देखील वसूल करत आहेत, असे न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न सेंटर फॉर बिझनेस अँण्ड ह्यूमन राईटस या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. फी वेगवेगळ्या स्वरुपात वसूल केली जात असून यासाठी मजुरांना त्यांचे १० ते १८ महिन्याचे वेतन कंपनीला द्यावे लागत आहे, असेही संस्थेने अहवालात नमूद केले आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने तेल निर्यात करणाऱ्या आखाती देशातील कंपन्यांवर त्याचा थेट परिणाम झाला आहे. पण तरीही या देशांमध्ये मजुरांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.  यामुळे गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून या कंपन्या मजुरांना आकृष्ट करतात. पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर त्यांना  कमी पगारात राबवून घेतले जाते असे संस्थेल्या पाहणीत आढळले आहे. मजुरांना कंपन्यांपर्यत पोहचवणारे एजंटही त्यांचे शोषण करत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कतारमध्ये २०२२ ला फूटबॉलचा विश्वचषक होणार आहे. या स्पर्धेसाठी तिथे भव्य स्टेडियमचे काम सुरू आहे. स्टेडियम बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजूर भरती सुरू आहे. यातील बहुतेक मजूर दक्षिण आशियाई देशातील आहेत. त्यांची मालकांकडून पिळवणूक होत आहे. तर दुसरीकडे २०२० मध्ये दुबईत होणाऱ्या वर्ल्ड एक्स्पोसाठी वाळवंटातील एका मोठ्या परिसरात प्रशस्त दालन उभारण्याचे काम सुरु आहे. तिथेही हेच चित्र बघावयास मिळत असल्याचे संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.