एएफसी आशियाई स्पर्धा, हिंदुस्थानसमोर यूएईचे आव्हान


सामना क्रीडा प्रतिनिधी । मुंबई

सलामीच्या लढतीत थायलंडला 4-1ने धूळ चारणाऱ्या हिंदुस्थानी फुटबॉल संघासमोर आज यजमान यूएई संघाचे आव्हान असणार आहे. यूएईचा संघ ‘फिफा’च्या क्रमवारीत 79 व्या स्थानावर आहे. त्यामुळे एएफसी आशियाई स्पर्धेतील ‘अ’ गटामध्ये तीन गुणांसह अव्वल स्थान असलेल्या हिंदुस्थानी संघासाठी आजची लढतही अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

आमच्यावर दबाव नाही – स्टीफन कॉन्स्टेण्टाइन
सलामीच्या लढतीत थायलंडला हरवून आम्ही आत्मविश्वास संपादन केलाय. आमच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे उत्साहही तेवढाच आहे. थायलंडपेक्षा यूएईचा संघ आणखी बलवान असेल, पण आम्ही दबाव घेणार नाही असे स्पष्ट मत हिंदुस्थानी फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेण्टाइन यावेळी व्यक्त केले.

यजमानांना हवाय विजय
यजमान यूएई व बहरीन यांच्यामध्ये झालेली पहिली लढत 1-1 अशा बरोबरीत राहिली. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुणावर समाधान मानावे लागले. आता यूएईला हिंदुस्थानविरुद्धच्या लढतीत विजय हवाय. यासाठी ते सर्वस्व पणाला लावतील यात शंका नाही.

खेळाडू फॉर्ममध्येच
हिंदुस्थानच्या खेळाडूंनी पहिल्या लढतीत जबरदस्त खेळ केला. उत्तरार्धात तर थायलंडवर वर्चस्व गाजवले. सुनील छेत्री, जेजे लालपेखलुआ, अनिरुद्ध थापा, प्रोणय हल्दर यांनी आपल्या खेळाची चुणूक दाखवली. आता उद्या होणाऱया लढतीत याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी हिंदुस्थानी संघ सज्ज झाला आहे. अनिरुद्ध थापा व प्रोणय हल्दर यांना मिडफिल्डमध्ये यूएईच्या खेळाडूंना बांधून ठेवावे लागणार आहे. एक चूकही महागात पडू शकते.