धमकी नाही समज देतोय, डॉल्बी लागलीच पाहिजे! उदयनराजेंचे नांगरे पाटील यांना आव्हान


सामना ऑनलाईन । सातारा

वेगवेगळ्या कारणांवरून सतत चर्चेत राहणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी गणेशोत्सवावरून थेट पोलिसांनाच खुलं आव्हान दिलं आहे. साताऱ्यात एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी डॉल्बी लावणार असल्याचं त्यांनी आव्हान दिलं आहे. गणेशोत्सवादरम्यान कायद्याच्या बंधनाला न जुमानता डीजे लावण्याचं आव्हान दिलं आहे. त्यावर आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात, त्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले की, ”२३ तारखेला विसर्जन आहे तेव्हा पाहू काय होतं आणि काय नाही होतं आणि कसं नाही होत. डॉल्बी लागलीच पाहिजेत, डेसिबल ठरवणारे कोर्ट आणि पोलीस डिपार्टमेंट कोण? डेसिबल ठरवतात तुमच्या आमच्यासारखे अवली लोक. खऱ्या अर्थाने आम्ही गणपतीचे भक्त आहोत. गणपतीला त्रास होत नाही तर इतरांना त्रास व्हायचं काही कारणच नाही. त्रास तरीही झालाच तर एक दोन दिवस सहन करायला काही जात नाही. मोठ्या आवाजाने बिल्डींग पडतात.. हे पडतं… ते पडतं… या साऱ्या गोष्टी खोट्या आहेत. उलट जुन्या इमारती पाडण्यासाठी याचा वापर करा. जुन्या इमारतींची डागडुजी करत नाहीत. मात्र तुम्ही बिचाऱ्या ‘सुसंस्कृत पोरांचे’ हट्ट ऐकत नाहीत. मग काय करायचं हे पाहिलं जाईल. ही धमकी नाही तर ही मी समज देतोय, प्लॅन करा नाहीतर तुम्ही कोणत्याही कोर्टात जावा, डॉल्बी तर असणारच आहे.” असं उदयनराजे यावेळी म्हणाले. शोले चित्रपटातील गाण्याचा आधार घेत उदयनराजे म्हणाले की, जब तक है जान, तब तक डॉल्बी रहेगी… जब तक डॉल्बी रहेगी तब तक गणपती रहेगा. एवढंच सांगतो आता बोलायची वेळ नाही.” असं म्हणत त्यांनी थेट पोलिसांना आव्हान दिलं आहे.

दरम्यान, सर्वांनी न्यायालय आणि पोलिसांच्या आदेशाचे पालन करून कायद्याचा आदर करावा. कुठेही डॉल्बी लावू देणार नाही, अशी तंबी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.

summary- udayanraje bhosale challenges police over Dolby