शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जलपूजनाचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले

सामना ऑनलाईन। मुंबई

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात बनणाऱ्या विशाल स्मारकाच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाचं बुधवारी सरकारतर्फे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं. या निमंत्रणाचा उद्धव ठाकरे यांनी स्वीकार केला. राज्यसरकारतर्फे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्री इते जाऊन भेट घेतली आणि त्यांना निमंत्रण दिलं. २४ डिसेंबर रोजी हा जलपूजनाचा सोहळा होणार आहे, ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत.

गिरगांव चौपाटी येथून ज्या ठिकाणी जलपूजन होणार आहे त्या खडकापर्यंत जाण्यासाठी फक्त मोजकीच मंडळी जाऊ शकतात. या मंडळींमध्ये पंतप्रधान ,मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यासाठी जो तराफा वापरला जातो तो या जलपूजनाच्या कार्यक्रमासाठी वापरला जाण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील यांनी निमंत्रण दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका रात्री उशिरा छापून आल्या होत्या. पत्रिका मिळता क्षणीच उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले.