Lok Sabha 2019 खुर्ची हे आमचे स्वप्न नाही, तर देश हे स्वप्न!

uddhavji-devendraji5

सामना ऑनलाईन, नागपूर/अमरावती

खुर्ची हे आमचे स्वप्न नाही, तर देश हे आमचे स्वप्न आहे. शिवसेना-भाजपची युती ही सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आणि भगव्यासाठी झाली आहे, असे सडेतोड प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले. सामान्य माणूस ज्या आशेवर जगतो ती शेवटची आशा म्हणजे शिवसेना-भाजप युती! त्या आशेवर पाणी पडायला नको, अशी शिवसेनेची ठाम भूमिका असल्याचेही ते म्हणाले.

Photo:- शिवसेना-भाजप अभेद्य युती; अमरावतीत पहिला पदाधिकारी महामेळावा

युतीच्या पदाधिकाऱ्यांचे संयुक्त मेळावे आज नागपूर आणि अमरावतीत आयोजित करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा उपस्थित होते. मेळाव्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची सालटी तर काढलीच, पण ज्या सामान्य माणसासाठी आम्ही संघर्ष केला, त्याच्या कल्याणासाठीच आम्हाला सत्ता हवी आहे. सत्ता भोगण्यासाठी आम्हाला नको आहे, असे ठामपणे सांगितले.

आतापर्यंत हिंदुत्वाचा उच्चार केला की त्याला अस्पृश्य समजले जात होते. हिंदुत्व ही शिवी असल्याचेही काही जणांना वाटत होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व अटलबिहारी वाजपेयी यांनी हे जळमट दूर केले. त्यांनी रक्त आटवल्यामुळेच आज देशात हिंदुत्वाचे तेज लखलखत आहे. या नेत्यांसोबतच शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनीही अपार कष्ट उपसले, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

दोन कडवट हिंदुत्ववादी पक्ष दुर्दैवाने दूर चालले होते. आता आमची मने स्वच्छ आहेत. आम्ही एकत्र आल्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. सांगायला मुद्देही नसल्याने ते जातीयवादाची विषपेरणी करीत आहेत. ही विषवल्ली या निवडणुकीत उखडून टाका, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

चांगल्याला चांगले म्हणण्याची आणि पटत नाही ते उघडपणे बोलण्याची ठाकरी परंपरा आहे. करायचे ते दिलखुलास आणि मनमोकळे हा आमचा स्वभाव आहे. म्हणून खुल्या दिलाने आणि खुल्या मनाने युती केली. देशात आणि राज्यातही विकासाचा झंझावात सुरू आहे. पन्नास वर्षांत केली नाही इतकी कामे पाच वर्षांत झाली. म्हणूनच युती केली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी, खासदार आनंदराव अडसूळ, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार, विदर्भ समन्वयक डॉ. दीपक सावंत यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.<

…तर विरोधकांचे फावले असते

केंद्र व राज्यात विकासकामाच्या अनेक योजना आहेत. परंतु शासकीय यंत्रणेत झारीतील शुक्राचार्य बसले आहेत. योजना उत्तम असल्या तरी त्या तळागाळापर्यंत पोहचवणे हे आपले कर्तव्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी स्वत: एकत्र दिसलो. त्यामुळे महत्वाचा प्रश्न निकालात निघाला आहे. युती झाली नसती तर विरोधकांचे फावले असते. या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचल्याच पाहिजेत आणि त्यासाठीच युतीची सत्ता येणे गरजेचे आहे, असे स्पष्ट प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. आमची युती सत्तेसाठी नाही तर सामान्यांच्या कल्याणासाठी आहे. विकासाची आहे, हिंदुत्वाची आहे. आमचा धर्म युती, आमचा उमेदवार युतीचा. म्हणूनच शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना  प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहनही या वेळी उद्धव ठाकरे यांनी केले.

आता शरद पवारांना भाजपात घेऊ नका!

आमच्यातील संघर्ष दुर्दैवी होता. पण आता आम्ही मतदारसंघासोबत माणसेही जिंकतो. राधाकृष्ण विखे-पाटलांनी शिवसेनेवर टीका केली. म्हणून त्यांना आडव्या हाताने घेण्याची तयारी केली तर सुजय विखे भाजपात आले. नितीनजी, आता मोदींना सांगा की, शरद पवारांना भाजपात घेऊ नका. नाहीतर टीका करण्यासाठी कोणी विरोधकच उरायचा नाही, अशी कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी मारली. तिकडे पाकिस्तानात एक खेळाडू पंतप्रधान झाला आणि इकडे पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणारे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष झाले, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना हाणला.

लढताय, पण कॅप्टन कुठे आहे!

शिवसेना-भाजप युतीसमोर आव्हान उभे करण्यासाठी आमचे विरोधक आटापिटा करत आहेत, लढण्याचा आव आणत आहेत. पण त्यांच्याकडे कॅप्टनच नाही. एक कॅप्टन होता, पण त्याने खेळण्यापूर्वीच माघार घेतली, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर नाव न घेता टीका केली. शिकसेना-भाजपची युती ही किकासाची युती आहे. देशाचे राष्ट्रीयत्व जपणारी युती आहे. विकासाचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आमची बांधिलकी सर्वसामान्यांशी आहे, शेतकऱ्यांशी आहे. त्यांच्या हितासाठी आम्ही सत्तेत असूनही आवाज उठवला. शिवसेनेने जे पटले नाही ते थेट मांडले. विकासाच्या आड आम्ही कधी आलो नाही. ज्यांच्यासाठी संघर्ष केला त्यांच्यासाठीच आम्हाला सत्ता हवी आहे.